…म्हणून भाजपाने माघार घेतली, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरून जयंत पाटलांचा खोचक टोला
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेतली आहे. यावरून जयंत पाटील यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे,
मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाने (BJP) माघार घेतली आहे. भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता शिवसेना (Shiv sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपाने आज अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली, भाजपाच्या या निर्णयावर विविध स्थरातून प्रतिक्रिया येत आहे. भाजपाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी खोचक टोला लगावला आहे. भाजपाला समोर पराभव दिसत होता त्यामुळेच भाजपाने निवडणुकीतून माघार घेतल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
जयंत पाटील यांनी नेमकं काय म्हटलं?
जयंत पाटील यांनी भाजपाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना जोरदार टोला लगावला आहे. निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच ऋतुजा लटके उभ्या राहू नये म्हणून प्रयत्न सुरू होते. त्यानंतर त्यांचा राजीनामा मंजूर होऊ नये यासाठी अनेक अडथळे आणले गेले. शेवटी त्यांना कोर्टात धाव घ्यावी लागली. या सर्वांमुळे अंधेरीत ऋतुजा लटके यांच्या बाजुने वातावरण निर्मिती झाली होती असं पाटील यांनी म्हटलं आहे.
‘पराभवाची खात्री पटली’
भाजपाला माहित होते इथे आपला पराभव होणार आहे. पराभवाची खात्री झाल्यानंतर भाजपाने निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच शरद पवार यांनी देखील अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घ्यावे असे आवाहन केले होते असंही यावेळी जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांनी देखील भाजपावर जोरदार निशाणा साधाला आहे. यापूर्वीच उमेदवारी अर्ज मागे घेतला असता तर महाराष्ट्राची परंपरा जपली गेली असती असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.