Exclusive : राजीनामा का दिला? अजितदादा भाजपसोबत जाण्याची चर्चा का होते?; ‘त्या’ प्रश्नांवर शरद पवार यांचे रोखठोक उत्तर
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे राजीनामा मागे घेतल्यानंतर पुन्हा सक्रिय झाले आहेत. सकाळी बारामतीत कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर ते सोलापूरला गेले. नंतर पंढरपूरला आले.
पंढरपूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि नंतर नेते, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर तो मागे घेतला. शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर एकच राजकीय वादळ निर्माण झालं. पवार यांच्या राजीनाम्यावरून अनेक कयास वर्तवले गेले. पवार यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले. अजित पवार यांची जिरवली, अशी चर्चा सुरू झाली. सामान्य लोकांच्या मनातही हेच प्रश्न निर्माण होऊन संभ्रम निर्माण झाला. शरद पवार यांच्या राजीनाम्याचं खरं कारण काय? अजित पवार भाजपसोबत जाण्याच चर्चा का होते? सुप्रिया सुळे यांच्याकडे मोठी जबाबदारी मिळणार काय? असे सवाल सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. त्यावर खुद्द शरद पवार यांनीच टीव्ही9 मराठीशी Exclusive संवाद साधताना या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
राजीनामा का दिला? कारण काय?
शरद पवार : माझी सार्वजनिक जीवनाची सुरुवात 1 मे 1960 पासून झाली. मी 1 मे 1960 रोजी युवक काँग्रेसचा सदस्य झालो. 1967 साली विधानसभेत गेलो. तेव्हापासून ते आतापर्यंत विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा या चारही ठिकाणी मी 56 वर्ष आहे. एकही दिवसाचा ब्रेक नाही. या देशात सतत 56 वर्ष संसदीय राजकारणात राहणारे क्वचित लोक आहेत. अनेक मोठे नेते होऊन गेले. वाजपेयी होऊन गेले. पण त्यांचा एकदा ग्वाल्हेरमध्ये पराभव झाला. माधवराव सिंधियांकडून. अनेक नावे घेता येतील. लालकृष्ण अडवाणी, त्यांचाही एकदा पराभव झाला होता. मला आठवतं. कदाचित एक तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी सोडले तर संसदीय राजकारणात सातत्याने राहणारे क्वचितच नेते या देशात होते. मी त्यापैकी एक होतो.
मीही विचार करत होतो की कधी तरी थांबलं पाहिजे. नव्या पिढीला मी प्रोत्साहित करत असतो. त्यांना आणखी प्रोत्साहित करावं हा विचार माझ्या मनात पक्का होता. पण त्यात एक माझ्याकडून कमतरता झाली. मी सहकाऱ्यांना विश्वासात घेतलं नाही. त्याचं कारण म्हणजे मला असं वाटत होतं की, मी सहकाऱ्यांजवळ हा विषय काढला तर कुणी संमती देणार नाही.
पण आपण निर्णय घेतला तर एक दोन दिवस दु:खी होतील. नंतर आपण त्यांची समजूत काढू. पण या पद्धतीची प्रतिक्रिया महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर, अगदी आसामपासून केरळपर्यंत उमटल्या त्यामुळे मला निर्णय बदलावा लागला. अनेक सहकाऱ्यांनी संपर्क साधला. केवळ राष्ट्रवादीचेच नव्हते, तर अन्य पक्षाचेही नेते होते. उदा- सोनिया गांधी बोलल्या. कम्युनिस्ट पक्षाचे नेते बोलले. आणखी अनेक नेते बोलले. इतकी तीव्र प्रतिक्रिया पाहिल्यानंतर माझ्या सहकाऱ्यांनी मला फेरविचार करण्यास भाग पाडलं आणि मी विचार बदलला.
सुप्रिया सुळे यांना मोठी जबाबदारी मिळणार का?
शरद पवार : जबाबदारी घेण्याची तयारी असली पाहिजे. सुप्रिया सुळेंसह आमच्या अनेक सहकाऱ्यांचे लक्ष हे लोकसभा आणि विधानसभेकडे आहे. निवडणूक झाल्यावर शांतपणे बसून पुढची नीती ठरवू असं अनेकांचं मत आहे. बघुया त्यावर.
एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा होतेय…
शरद पवार : आम्ही काही ठरवून केलं नाही. ही काही स्टॅटेजी नव्हती. हा निर्णय ठरवून नव्हता. त्यामुळे कुणाल तरी मायनस करावं हे सूत्र त्यात नव्हतं. त्यामुळे काही लोक भाष्य करतात. त्यांना काही उत्तर देण्याची गरज नाही. माझ्या पक्षापुरतं सांगायचं झालं तर राष्ट्रवादीत कोणतीही अस्वस्थता नाही. इतरांचं सांगू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व सहकारी अभेद्य आहे.
अजित पवार भाजपसोबत जाणार?
शरद पवार : अशा चर्चेला काही आधार आहे? अजित पवार यांचे तीनदा स्टेटमेंट पाहिले. मी राष्ट्रवादीतच राहणार असं ते म्हणाले. पुन्हा पुन्हा ते सांगत आहेत. उगाच काही तरी नाही त्या गोष्टी करायच्या आणि एखाद्या बद्दल संभ्रम निर्माण करायचा हे काही योग्य नाही. मी असेल किंवा आमचे सहकारी असेल आम्ही सहसा तुमच्या लोकांशी संवाद साधायला नाही म्हणत नाही.
पण आमचे काही सहकारी नेहमी मीडियापासून दूर राहतात. मीडियापासून दूर राहून आपलं काम करत असतात. काम उत्तम करणं आणि कष्ट करणं असेही आमचे काही सहकारी आहेत. त्यात अजित पवार आहेत. त्यामुळे मीडियाशी बोलले नाहीत तर त्याचा अर्थ वेगळा काढला जातो. त्यापेक्षा काही वेगळं नाही.