पवारांच्या हाती भगवा, राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात भगवा फडकवण्याचे आदेश
राष्ट्रवादीच्या सभांमध्ये 'शिवरायांचा भगवा' आणि राष्ट्रवादीचा झेंडा असे दोन झेंडे राहणार आहेत अशी घोषणा अजित पवार यांनी परभणीतील सभेत केली.
परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) सभांमध्ये यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं (Chhatrapati Shivaji Maharaj) छायाचित्र असलेला भगवा झेंडाही (Saffron Flag) फडकणार आहे. घड्याळ चिन्हाच्या झेंड्यासोबत भगवाही फडकवण्याची घोषणा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी परभणीतल्या पाथरीमध्ये आयोजित शिवस्वराज्य यात्रेत केली.
आदिलशाही, अकबर, टिपू यांची राज्यं होती. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भोसल्यांचे राज्य कधी कुणी म्हटलं होतं का? त्यांच्या राज्यात रयतेचं राज्य म्हटलं गेलं होतं. यापुढे राष्ट्रवादीच्या सभांमध्ये ‘शिवरायांचा भगवा’ आणि राष्ट्रवादीचा झेंडा असे दोन झेंडे राहणार आहेत अशी घोषणा अजित पवार यांनी सभेत केली.
’10 जून 1999 रोजी शिवाजी पार्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. तेव्हापासून घड्याळाचं बोधचिन्ह असलेला झेंडा होता. मात्र यापुढे दोन झेंडे फडकतील. छत्रपती शिवाजी महाराज ही कोणाची जहागिरी नव्हती, कोणा एकट्याची मालकी नव्हती. छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे आहेत’ असं म्हणत अजित पवारांनी महाराजांचं छायाचित्र असलेला भगवा झेंडाही राष्ट्रवादी आगामी सभांमध्ये फडकवणार असल्याचं जाहीर केलं.
शिवसेनेच्या सभांमध्ये आतापर्यंत भगवा झेंडा फडकत आलेला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपानेही ‘शिवछत्रपतींचा आशीर्वाद… चला देऊ भाजपला साथ’ अशी घोषणा केली होती. आता आगामी निवडणुकांच्या तोंडावर धर्मनिरपेक्ष अशी ओळख असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा आणल्याचं दिसत आहे.
राष्ट्रवादीतून अनेक नेते भाजप किंवा शिवसेनेचा भगवा झेंडा हातात घेताना दिसत आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या हातातही आता भगवा झेंडा दिसेल.
…तर पवारांची औलाद सांगणार नाही : अजित पवार
‘आमचं सरकार सत्तेवर आलं, की सहा महिन्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही, तर पवारांची औलाद सांगायचो नाही’ असं खुलं आव्हान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलं. बीडमधील परळीत राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान अजित पवार बोलत होते.
‘तुम्ही म्हणाल अजित पवार, तुम्ही एवढं कडक सांगताय, काय तुम्ही करणार? आमचं सरकार सत्तेवर आलं, तर आम्ही त्यांच्यासारखी कर्जमाफी तुम्हाला करणार नाही. मी आपल्या सर्वांना सांगतो, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या साक्षीने सांगतो… परळीकरांनो, मी दिलेला शब्द पाळणारा कार्यकर्ता आहे. पहिल्या चार ते सहा महिन्यांमध्ये तुम्हा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही, तर पवारांची औलाद सांगायचो नाही.’ अशी गर्जना अजित पवारांनी केली.