मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपसोबत (BJP) जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांनी जाहीरपणे अजित पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे. अजित पवार जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य आहे. अजित पवार जिथे जातील तिथे आम्ही जाऊ. विधानसभेत अजित पवार यांच्या इतका ताकदवार नेता नाही. तेच राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते आहेत, अशी भूमिका या दोन्ही आमदारांनी जाहीरपणे घेतली आहे. त्यामुळे राजकारणातील घडामोडी आणखी कोणत्या दिशेला जाणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभाचे आमदार अण्णा बनसोडे आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी जाहीरपणे अजित पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे. विशेष म्हणजे अण्णा बनसोडे मुंबईला रवाना झाले आहेत. अजित पवार यांनी आपल्याला मुंबईला बोलवलं असल्याचा दावा त्यांनी केलाय. बनसोडे हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून मानले जातात. अजित दादा जिथे जातील, तिथे मी जाणार, असं जाहीरपणे बनसोडे ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना म्हणाले आहेत.
“मागील काळातही सत्तासंघर्षाच्या वेळी आम्ही अजित पवार यांच्यासोबत होतो. त्याचाच एक भाग म्हणून मी अजित पवार यांच्यासोबत त्यावेळेस त्यांच्या पाठीशा आणि सोबत होतो. अजित पवार उद्या जो काही निर्णय घेतील त्याला माझा पाठिंबा असेल. माझं त्या निर्णयाला समर्थन असेल. आम्ही केव्हासोबत राहू. मी माझं ऑफिसचं काम उरकून मुंबईला जाणार आहे. तिथे चर्चा होणार आहे. चर्चा नंतर काय ठरणार ते तुम्हाला उद्या-परवा लगेच समजेल. अजित पवार यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द झाले.आमचाही अजित पवार यांच्याशी संबंध नाही. पण मुंबईत जाऊन आम्ही त्यांची भेट घेणार आहोत. अजित पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल”, असं अण्णा बनसोडे म्हणाले.
सिन्ररचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी आज पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. “अजित पवारांशी 20 मिनिटं शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा केली. त्यानंतर मी विचारलं काय चाललंय सगळं? आम्ही पक्षाचे आमदार आहोत. पक्ष घेईल तो निर्णय आम्हाला मान्य आहे. आम्ही पक्षासोबत आहोत. राज्यात सध्या अस्थिर परिस्थिती आहे. राष्ट्रवादीला सोबत घेणं एवढा एकच पर्याय सध्या भाजपकडे आहे”, असं माणिकराव कोकाटे म्हणाले.
“भाजपसोबत गेल्यास राष्ट्रवादीला फायदा होईल की नाही माहिती नाही, मात्र भाजपाला फायदा होईल. भाजप केंद्रात सत्तेत येईल. आता आमचे आमदार अस्वस्थ आहेत हे नक्की आहे. अजित दादा भाजपसोबत जाणार असतील तर आम्ही पक्षासोबत आणि दादासोबत जाणार. कोर्टाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत राष्ट्रवादी काही निर्णय घेईल, असं वाटत नाही. राजकारणात परिस्थितीनुसार निर्णय घ्यायचे असतात”, असं सूचक विधान माणिकराव कोकाटे यांनी केलं.
“सत्तेशिवाय शहाणपण नाही. त्यामुळे विकास कामांसाठी सत्ता हाच एक पर्याय आहे. प्रश्न सोडण्यासाठी सरकारमध्ये असणं महत्वाचं आहे. अजित दादा पक्षाला विचारूनच निर्णय घेतील. मला तरी अद्याप कोणत्याही प्रकरचा फोन नाही. आज अजित पवारांना वजा केलं तर विधानसभेत एवढा प्रभावी नेता नाही. सरकारमधून 16 आमदार गेल्याने सरकार पडणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत आताच्या सर्व्हेमध्ये भाजप 10-15 च्या वर जाणार नाही. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीची गरज पडणार”, अशी प्रितक्रिया माणिकराव कोकाटे यांनी दिली.
“विधानसभेच्या फ्लोअरवर अजित दादांचं नाव सोडलं तर दुसरा एकही नेता तेवढा सक्षम नाही, ज्यांच्यावर आमदार विश्वास टाकू शकतील. आपले सगळे प्रश्न या व्यक्तीच्या माध्यमातून सुटतील असं कुणीही नाही. त्यामुळे अजित पवार वेगळे झाले तर काय होईल? अशा प्रकारचं संभाव्य व्यक्त करणं चुकीचं आहे. पण अजित पवार यांच्याबरोबरचा नेता दुसरा कुणी नाही. अजित पवार यांची मनस्थिती समजूत घेत नाही, त्यांच्या मनात आहे की नाही हे कळत नाही तोपर्यंत मी त्यावर का वक्तव्य करावं?”, असा सवाल त्यांनी केला.
“राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांची कोंडी होत नाही, असं मला वाटतं. ते राष्ट्रवादीचे सर्वस्व आहेत. आजही तेच आहेत. त्यांनाच सर्व अधिकार आहेत. त्यामुळे त्यांची कोंडी होते असं म्हणणं योग्य होणार नाही”, असंही ते यावेळी म्हणाले.