माढ्यात दुसरा भूकंप, रणजितसिंह मोहिते पाटील भाजपच्या गळाला?
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार आहे. माढ्याचे विद्यमान राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) हे चक्क भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. थेट विद्यमान राष्ट्रवादीच्या खासदाराचा सुपुत्र भाजपमध्ये प्रवेश करत असल्यामुळे हा मोहिते पाटलांसह राष्ट्रवादीला मोठा […]
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार आहे. माढ्याचे विद्यमान राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) हे चक्क भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. थेट विद्यमान राष्ट्रवादीच्या खासदाराचा सुपुत्र भाजपमध्ये प्रवेश करत असल्यामुळे हा मोहिते पाटलांसह राष्ट्रवादीला मोठा धक्का आहे.
रणजितसिंह मोहिते पाटील आणि काँग्रेस नेते सुजय विखे पाटील हे दोघेही आज भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता निश्चित आहे. दोघेही आज भाजप नेते गिरीश महाजनांच्या भेटीला जाताना एकत्र, एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळाले.
रणजितसिंह मोहिते पाटील हे गेल्या अनेक महिन्यांपासून असस्वस्थ आहेत. आपलं राजकीय खच्चीकरण होत असल्याचा आरोप त्यांनी सातत्याने बोलून दाखवला होता. गेल्या अनेक दिवसांपासून माढा लोकसभा मतदारसंघात खदखद सुरु आहे. त्या वादातूनच स्वत: विजयसिंह मोहिते पाटलांनी शरद पवारांना इथे निवडणूक लढण्यास सांगितलं होतं. त्यानंतर शरद पवारांनीही निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. मात्र काल कौटुंबिक कारण देत पवारांनी माढ्यातून माघार घेतली.
यानंतर माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीतून विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील आणि माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचं नाव चर्चेत होतं. मात्र आता रणजितसिंह मोहिते पाटील हे थेट भाजपच्या गोटात सहभागी होणार हे जवळपास निश्चित आहे.
कोण आहेत रणजितसिंह मोहिते पाटील?
रणजितसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीचे माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र आहेत.
रणजितसिंह हे राज्यसभेचे माजी खासदार आहेत.
2009 ते 2012 या कालावधीत रणजितसिंह हे राज्यसभेत होते.
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे ते सुपुत्र आहेत.
रणजितसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. शिवाय, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते अध्यक्षही होते.
सोलापूर विभागाचंही महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतही रणजितसिंहांनी प्रतिनिधित्त्व केले होते.