अभिनेते किरण माने (Kiran mane) यांनी भाजप विरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांना मुलगी झाली हो या मालिकेमधून काढले आहे. अशा झुंडशाही विरोधात आवाज उठवला गेला पाहिजे, नाहीतर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही. असे प्रखर मत बाबासाहेब पाटील (Ncp) यांनी मांडले आहे. बाबासाहेब पाटील हे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेश अध्यक्ष आहेत. शरद पोंक्षे,आरोही वेलणकर, कंगना राणावत, अनुपम खेर, यांच्या सारखे कलाकार उघड-उघड भाजप समर्थनार्थ आपले मत मांडत असतात, अशा वेळी त्यांना चित्रपट किंवा नाटकातून काढण्यात येत नाही. याउलट त्यांना पद्मश्री व एफ टी आय सारखी मोठी मोठी लाभाची पदे देऊन सन्मानित केले जाते, असा आरोपही केला आहे.
कलाकारला असे काढणे निंदनीय
दिल्लीतील शेतकरी आंदोलन किंवा इतर सामाजिक आंदोलनावर भाष्य केल्यानंतर किरण माने सारख्या एका हरहुन्नरी कलाकाराबद्दल अशा प्रकारचे कृत्य केले जाते हे खरच अशोभनीय काम आहे. कारण या देशात प्रत्येक व्यक्तीला व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि अशा परिस्थितीत त्यांनी काय बोलावं काय लिहावा हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, अशा वेळी कुठल्याही चैनल किंवा कुठल्याही कंपनीला कलाकारांच्या वैयक्तिक जीवनतील मतप्रवाहचे राजकारण करून एखाद्या कलाकाराची उपजीविका हिरावून घेणे ही बाब अन्याय करणारी व अशोभनीय तसेच निंदनीय सुध्दा आहे, असेही ते म्हणाले.
मालिका चित्रीत होऊ देणार नाही
सांस्कृतिक क्षेत्र हे जनजागृतीचे एक उत्तम माध्यम आहे. अशावेळी मतमतांतरे ही प्रत्येक कलावंतांची किंवा प्रत्येक व्यक्तीची वेगळी असू शकतात. दरम्यान एखाद्या कलाकाराला त्याच्या वैयक्तिक मतासाठी अशा प्रकारचे कृत्य करणे म्हणजे हा एक प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद आहे, असे मत बाबासाहेब पाटील यांनी मांडले आहे. त्यामुळे किरण माने यांनी यापुढे स्वतःला एकटे समजू नये त्यांच्या पाठीशी अखा महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे तर किरण माने यांना वाहिनीने परत सन्मानाने कामावर घ्यावे, अन्यथा मुलगी झाली हो या सिरियलचे पुढील भाग चित्रीत होऊ देणार नाही. असे बाबासाहेब पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चित्रपट संस्कृत विभागाच्या वतीने कळवले आहे.