माजी पंतप्रधानांचा मुलगाही भाजपच्या गळाला, लवकरच पक्ष प्रवेश होण्याची शक्यता
त्तर प्रदेशातील बलियामधून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती. पण सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी तिकीट दिलं नाही. तेव्हापासून दोघांमध्ये संवादही बंद असल्याचं बोललं जातंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीनंतर नीरज शेखर भाजपात प्रवेश करु शकतात.
नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार आणि माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे चिरंजीव नीरज शेखर यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला. उत्तर प्रदेशातील बलियामधून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती. पण सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी तिकीट दिलं नाही. तेव्हापासून दोघांमध्ये संवादही बंद असल्याचं बोललं जातंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीनंतर नीरज शेखर भाजपात प्रवेश करु शकतात.
नीरज शेखर यांनी राजीनामा दिला तेव्हा अखिलेश यादव हे देखील दिल्लीतच होते. राजीनाम्याबाबतची माहिती अखिलेश यादव यांना दिल्याचीही माहिती आहे. यावेळी बलियामधून सपाने सनातन पांडे यांना तिकीट दिलं. यानंतर नाराज झालेल्या नीरज शेखर यांनी पक्षाचा प्रचारही केला नाही. नीरज यांचे वडील चंद्रशेखरही बलियामधून खासदार होते. वडिलांच्या निधनानंतर 2007 मध्ये नीरज यांनी पोटनिवडणूक लढवली आणि त्यामध्ये विजय मिळवला. त्यांनी 2009 च्या निवडणुकीतही विजय मिळवला होता.
2014 ला बलियामधून नीरज शेखर यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. भाजपचे उमेदवार भरत सिंह यांनी जवळपास सव्वा लाख मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. गेल्या 8 जुलैलाच चंद्रशेखर यांची पुण्यतिथी होती. श्रद्धांजली देण्यासाठी भाजपचे अनेक खासदारही आले होते, ज्यात राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे चिरंजीव खासदार दुष्यंत सिंह, खासदार निशिकांत दुबे यांचा समावेश होता.