मोदी नाही तर काय पाकिस्तानचे पंतप्रधान संसदेचं उद्घाटन करतील काय?; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर
Acharya Pramod Krishnam on New parliament building inauguration : नव्या संसद भवनाचं उद्घाटन अन् विरोधकांची टीका; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर
नवी दिल्ली : नव्या संसद भवनाचं येत्या 28 मेला उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या इमारतीचं उद्घाटन होणार आहे. याला विरोधकांनी कडाडून विरोध केला आहे. विशेषत: काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन करण्याला विरोध केला आहे. मात्र काँग्रेसच्या एका नेत्यानं काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.
काँग्रेसचे नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी संसदेच्या उद्घाटनावर प्रतिक्रिया दिली आहे. नव्या संसदेचं उद्घाटन भारताचे पंतप्रधान करणार नाहीत तर काय पाकिस्तानचे पंतप्रधान करतील काय?, असा प्रश्न आचार्य प्रमोद कृष्णम यांनी विचारला आहे.
भारताची संसद ही भारताच्या इतिहासाची परंपरा आहे. ती भाजपची परंपरा नव्हे. जर देशाच्या संसदेचं उद्घाटन भारताच्या पंतप्रधानांच्या हस्ते होणार नाही, तर काय पाकिस्तानचे पंतप्रधान येऊन ते करणार का? संसद,राष्ट्रपती भवन या सारख्या इमारती कोणत्याही पक्षाच्या मालकीच्या नाहीत. या इमारती देशाची संपत्ती आहेत. नरेंद्र मोदी यांच्या विचारांना विरोध केला पाहिजे. त्यांच्या निर्णयांचा विरोध केला पाहिजे. आम्ही सर्वजण मिळून तो करू. पण देशातील जनतेच्या भावनांचा आदर केला पाहिजे. आम्हाला नरेंद्र मोदी यांना विरोध करण्याचा अधिकार आहे. पण भारत देशाला विरोध करणं योग्य नाही, असं आचार्य प्रमोद कृष्णम यांनी म्हटलं आहे.
19 विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. पंतप्रधनांनी या इमारतीचं उद्घाटन करू नये. तर राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावं, अशी विरोधकांची मागणी आहे.
संजय राऊत यांनीही आजच्या पत्रकार परिषदेत भाजपवर निशाणा साधला आहे. राष्ट्रपती आणि संसद मिळून लोकशाही आणि पुढच्या प्रक्रिया सुरू होतात. मात्र आपण एक पॉलिटिकल इव्हेंट म्हणून राजकीय उत्सव साजरा करण्यासाठी प्रधानमंत्री याचा उद्घाटन करावं, असं भाजपने ठरवलं आहे. ते चुकीचं आहे. आमचा मुद्दा संविधानिक आणि नैतिकतेचा आहे. नवीन संसद भवन उभारला आनंद आहे. त्याचं उद्घाटन होतंय, याचा आनंदच आहे. मात्र या निमित्ताने देशाच्या संविधानावरती हल्ला होत आहे. पंतप्रधानांनी संसदेचं उद्घाटन करण्याला आमचा विरोध आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर टीका केलीय.