नवी दिल्ली : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांवर हल्लाबोल करण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाकडून शिवसेना शिंदे गटावर हल्लाबोल करत असताना गद्दार, चोर यांसह निवडणूक आयोगाच्या निर्णयावर टीका करत असताना पैसे देऊन निकाल घेतल्याची टीका करण्यात आली होती. यावरूनच शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे गटाकडून राहुल शेवाळे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याच याचिकेच्या संदर्भात नुकतीच सुनावणी पार पडली असून यामध्ये पुढील सुनावणीच्या दरम्यान उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना उपस्थित राहण्याचे समन्स दिले जाणार आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील ही सर्वात मोठी बातमी असल्याचे बोललं जात आहे.
शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह सोशल मीडियावर केली जाणाऱ्या टीकेच्या संदर्भात एक याचिका दाखल केली होती.
यामध्ये उद्धव ठाकरेंना सोडून जे आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले, त्यांच्यावर गद्दार, चोर, पन्नास खोके एकदम ओके यासह विविध प्रकारच्या संदर्भात टीका करण्यात आली होती. त्यात टिकेला थेट न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या संदर्भात आता लवकरच पुढील सुनावणी होणार आहे. त्या सुनावणी मध्ये मात्र ज्यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहे त्यांना यामध्ये समन्स बजावण्यात आलेले आहे.
त्यामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना हे समन्स बजावले जाणार असल्याची माहिती आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला होता.
यामध्ये निवडणूक आयोगाला पैसे देऊन हा निर्णय घेतल्याची टीका संजय राऊत यांनी केली होती. त्यामुळे स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगावर अशी टीका केल्याने जनमानसात एक वेगळा संदेश जातो म्हणून ही याचिका करण्यात आली होती.
याशिवाय ठाकरे गटाकडून गद्दार, चोर आणि मिंधे अशा विविध स्वरूपाची टीका करण्यात आल्याने शिवसेना शिंदे गटाने कोर्टात धाव घेतली होती. आता त्याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाकडून समन्स बजावले जाणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली आहे.