नाशिकमध्ये नवीच चर्चा.. फडणवीस यांची पुढची खेळी? तांबे नव्हे; ‘या’ उमेदवाराला शिंदे-भाजपचा पाठिंबा मिळणार?
अद्याप नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजप आणि शिंदे गट यांचा कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. तर अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असा महाविकास आघाडीचा पाठिंबा जाहीर करण्यात आलाय.
चेतन गायकवाड, नाशिकः नाशिक (Nashik) पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची (Election) चुरस दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. काँग्रेसला व्हेंटीलेटरवर ठेवत ऐनवेळी तांबे पिता-पुत्रांनी दगा दिलाच. आता सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांना भाजपाचा पाठिंबा मिळणार की नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तांबे यांच्या निर्णयामागे भाजप असेल तर भाजपने अद्याप सत्यजित तांबे यांना पाठिंबा का दिला नाही, असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. फडणवीस यांची नवी खेळी काय आहे, हेच कोडं सर्वांना पडलंय. दोन दिवसात नाशिकमध्ये आणखी नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कारण शिंदे गट आणि भाजप आम्हालाच पाठिंबा देणार असल्याचा दावा स्वराज्य संघटनेने केला आहे.
दोन दिवसात नवा ट्विस्ट?
नाशकात फडणवीस यांची नवी खेळी दिसणार, अशीच चर्चा आहे. कारण देवेंद्र फडणवीस आणि स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष छत्रपती संभाजी महाराज हे पुढील दोन दिवसात नाशिकमध्ये येणार आहेत. स्वराज्य संघटनेचे नेते सुरेश पवार यांनीही नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे.
या निवडणुकीचे प्रमुख उमेदवार म्हणून सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील अशी निवडणूक रंगणार असल्याचं म्हटलं जात असतानाच सुरेश पवार यांनी केलेल्या दाव्यांनी नव्यानं चर्चा घडू लागल्यात. आम्ही सर्वच पक्षांचा पाठिंबा मागणार आहोत, असं वक्तव्य सुरेश पवार यांनी केलंय.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या माध्यमातून भाजप आणि शिंदे गटासोबत बोलणी सुरू आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात तुम्हाला नाट्यमय घडामोडी पाहायला मिळेल, असा दावा स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांनी केला आहे.
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी प्राथमिक बोलणी सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच येत्या दोन दिवसांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छत्रपती संभाजीराजे नाशिकमध्ये येत असल्याने नवा ट्विस्ट बघायला मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे.
अद्याप नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजप आणि शिंदे गट यांचा कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. तर अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असा महाविकास आघाडीचा पाठिंबा जाहीर करण्यात आलाय.