उद्धव ठाकरे यांना भारत जोडो यात्रेचं निमंत्रण, निलेश राणे यांनी उडवली खिल्ली म्हणाले…
येत्या सात नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार आहे. या यात्रेच निमंत्रण उद्धव ठाकरे यांना देखील देण्यात आलं आहे. यावरून निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.
मुंबई : सध्या काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जोरात सुरू आहे. या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतोय. लाखोंच्या संख्येनं लोक या भारत जोडो यात्रेत सहभागी होत आहेत. आता लवकरच या यात्रेचं महाराष्ट्रात आगमन होणार आहे. येत्या 7 नोव्हेंबर रोजी ही यात्रा नांदेड जिल्ह्यात दाखल होणार आहे. नांदेड जिल्ह्यात या यात्रेचा पाच दिवस मुक्काम असणार आहे. तर हिंगोली जिल्ह्यात चार दिवस यात्रेचा मुक्काम असणार आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे 9 नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. तसेच या यात्रेत सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना देखील निमंत्रण देण्यात आलं आहे. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे. त्यांनी एक व्यंगचित्र रिट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
निलेश राणे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा
निलेश राणे यांनी एक व्यंगचित्र रिट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. हे व्यंगचित्र महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर हॅंडलवरून पोस्ट करण्यात आलं होतं. या व्यंगचित्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासमोर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या दिसत आहेत. एकीकडे भारत जोडो यात्रा दिसत आहे. या व्यंगचित्रात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे देखील आहेत. ते आपल्या वडिलांना उद्धव ठाकरे यांना म्हणत आहेत की, ‘ बाबा इथलं झालं असेल तर तिकडे मुजरा घालायला चला’ असं व्यंगचित्र ट्विट करून निलेश राणेंनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा डिवचले आहे. आता ठाकरे गट निलेश राणे यांच्या टीकेला काय प्रत्युत्तर देतो हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
काँग्रेस कडून उद्धव ठाकरेंना ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होण्याचे आदेश! pic.twitter.com/YPJY9Y7LCY
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 19, 2022
7 नोव्हेंबरला भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात
येत्या सात नोव्हेंबर रोजी भारत जोडो याात्रा महाराष्ट्रात दाखल होणार आहे.याबाबत काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी माहिती दिली आहे.यावेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, सात नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रा नांदेड जिल्ह्यात दाखल होईल.नांदेड जिल्ह्यात ही यात्र पाच दिवस असेल तर हिंगोली जिल्ह्यात चार दिवस असणार आहे. नांदेड जिल्ह्यात या यात्रेचा जवळपास 120 किलोमीटर प्रवास होणार आहे.यात्रेची तायरी अंतिम टप्प्यात आहे. लाखोंच्या संख्येनं या यात्रेत लोक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. शरद पवार हे 9 नोव्हेंबरला या यात्रेत सहभागी होणार आहेत. उद्धव ठाकरे यांना देखील या यांत्रेच निमंत्रण देण्यात आलं आहे. आदित्य ठाकरे देखील या यात्रेत सहभागी होण्याची शक्यता असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.