जो ‘मातोश्री’वर गांधीजी पाठवतो, त्यालाच पदोन्नती : निलेश राणे
महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे नेते रामदास कदम यांना स्थान देण्यात आलेले नाही. याच मुद्याचा धागा पकडत निलेश राणे यांनी शिवेसेनेवर टीका केली.
सिंधुदुर्ग : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Nilesh Rane slams Ramdas Kadam) यांना महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडाळात जागा मिळालेली नाही. याच मुद्द्याचा धागा पकडत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे (Nilesh Rane slams Ramdas Kadam) यांनी रामदास कदम आणि शिवसेनेवर टीका केली. ‘मातोश्री’ने रामदास कदम यांना त्यांची लायकी दाखवली. त्याचबरोबर ‘मातोश्री’वर जो गांधीजी पाठवतो म्हणजे पैसे पाठवतो त्याचीच पदोन्नती होते, असा घणाघात निलेश राणे यांनी केला.
‘मातोश्री’वर पदोन्नतीसाठी फक्त दोन गोष्टी लागतात. पहिली गोष्ट म्हणजे नारायण राणे यांच्यावर टीका आणि दुसरी म्हणजे गांधीजींचे दर्शन. गांधीजींचे दर्शन म्हणजे पैसा. मातोश्रीवर जो पैसे पाठवेल त्याची पदोन्नती होते. शिवसेनेचे नेते दीपक केसकर यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली. त्यामुळे शिवसेनेने त्यांना मोठे केले. तर उदय सामंत ठेकेदार आहेत. ते ‘मातोश्री’वर पैसे पाठवतात. त्यामुळे त्यांना यावेळी मंत्रिपद मिळाले, असा दावा निलेश राणे यांनी केला.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या दिवशी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी शपथ घेतली त्यावेळी शिवसेनेचे नेते संजय राऊत शपथविधी सोहळ्याला गैरहजर होते. त्यांचे भाऊ सुनील राऊत यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. यावरही निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. ‘उद्धव ठाकरे कोणाचेही नाहीत. जवळचे असणारे लोक कधी लांब टाकले जातील ते सांगता येणार नाही. याबाबत उद्धव ठाकरे काय विचार करून निर्णय घेतात त्यांनाच माहीत’, असे निलेश राणे म्हणाले.
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंळाचा बहुप्रतीक्षित विस्तार सोमवारी म्हणजे ३० डिसेंबर २०१९ रोजी पार पडला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या एकूण ३५ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यात राजकीय पातळीवर नाराजी नाट्य बघायला मिळाले. त्यानंतर विरोधी पक्षांकडूनही मंत्रिमंडळ विस्तारावरुन निशाणा साधला गेला. आरोप-प्रत्यारोपाच्या राजकीय नाट्यामध्ये आता निलेश राणे यांनी देखील उडी मारली.