‘उजेडात बाळासाहेबांची गरज नव्हती, अंधारात बाळासाहेब आठवतात’, उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचे दोन फोटो ट्वीट करत निलेश राणेंचा टोला
संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतलीय. ही मुलाखत 26 आणि 27 जुलैला प्रदर्शित केली जाणार आहे. त्या मुलाखतीचे दोन टीझरही राऊत यांनी ट्वीट केलेत. मात्र, भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचे दोन फोटो ट्वीट करत ठाकरेंना जोरदार टोला लगावलाय.
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेना दुभंगली. आता शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा? असा प्रश्न विचारला जात असून त्याचा निकाल आता निवडणूक आयोग (Election Commission) देणार आहे. अशावेळी संघटना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. शिवसंवाद यात्रा, बैठका अशा अनेक माध्यमातून कार्यकर्त्यांना जोडून ठेवण्याचं काम सध्या केलं जात आहे. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतलीय. ही मुलाखत 26 आणि 27 जुलैला प्रदर्शित केली जाणार आहे. त्या मुलाखतीचे दोन टीझरही राऊत यांनी ट्वीट केलेत. मात्र, भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचे दोन फोटो ट्वीट करत ठाकरेंना जोरदार टोला लगावलाय.
मंगळवारी प्रदर्शित होणाऱ्या मुखातीचा टीझर आणि फोटोही संजय राऊत यांनी ट्वीट केलाय. त्यात संजय राऊत आणि उद्धव ठाकरे दिसत आहेत. त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही या दोघांच्यामध्ये स्पष्ट दिसत आहे. नेमका हाच धागा पकडत निलेश राणे यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय. उद्धव ठाकरे यांची संजय राऊतांनीच घेतलेली आधीची मुलाखत आणि आताची मुलाखत असे दोन फोटो निलेश राणे यांनी ट्वीट केलेत. त्यात आताच्या फोटोमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसतोय. तर आधीच्या मुलाखतीत बाळासाहेबांचा फोटो पाहायला मिळत आहे. सत्ता होती तेव्हाची मुलाखत आणि सत्ता गेल्यानंतरची मुलाखत, अस निलेश राणेंनी या फोटोंबाबत आवर्जुन सांगितलंय. तसंच ‘उजेडात बाळासाहेबांची गरज नव्हती, नेहमी अंधारात बाळासाहेब आठवतात’, असं कॅप्शन देत निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय.
उजेडात बाळासाहेबांची गरज नव्हती, नेहमी अंधारात बाळासाहेब आठवतात. pic.twitter.com/cBGTq6et41
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 25, 2022
राऊत बेरोजगार, उद्धव ठाकरे घरीच असतात म्हणून फालव्या वेळात मुलाखत
संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्रात काय वजन आणि वलय आहे? संजय राऊत बेरोजगार आहेत आणि उद्धव ठाकरे घरीच असतात म्हणून फावल्या वेळात मुलाखत घेतली, असा टोला नितेश राणेंनी लगावलाय. आदित्य ठाकरे यांच्यावरही नितेश राणेंनी निशाणा साधला. अडीच वर्षात महाराष्ट्राचे नुकसान केले, ती गद्दारी आदित्य ठाकरे आणि त्यांच्या नाईट लाईफने केली. जेव्हा शिवसैनिकांना यांची गरज होती तेव्हा हे दिनो मोरियाबरोबर बसायचे. दिनो मोरियाला न भेटता शिवसैनिकांना भेटले असते तर ही निष्ठा यात्रा काढायची गरज नव्हती. तुमच्याकडे पदं होती तेव्हा तुम्हाला नाईट लाईफ आवडली. तुम्हाला त्यावेळी पटानी आवडली, तेव्हा शिवसैनिक आवडले नाहीत, अशा शब्दात नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केलीय.