नवी दिल्ली : कांद्याचे गगनाला भिडलेले भाव सध्या सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहेत. गल्ली ते दिल्ली सर्वत्र कांद्याच्या वाढत्या किमतीचीच चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कांद्याचा मुद्दा संसदेत उपस्थित केला. त्यावर उत्तर देता-देता एका खासदाराने विचारलेल्या प्रश्नावर ‘काळजी करु नका, मी कांदा-लसूण फार नाही खात’ असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman after Supriya Sule Questions) म्हणाल्या.
दिल्लीत संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून खासदार सुप्रिया सुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनातले प्रश्न मोदी सरकारला विचारत आहेत. अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा सुरु असताना सुप्रिया सुळेंनी मुद्रा योजना आणि कांद्याच्या वाढत्या किमती यांचा मुद्दा उपस्थित केला.
‘इजिप्तवरुन कांद्याची आयात करण्याचे कष्ट घेणं प्रशंसनीय आहे. मी कांद्याचा सर्वात मोठा संग्राहक असलेल्या महाराष्ट्रातील आहे. माझा पहिला प्रश्न आहे, की कांद्याचं उत्पादन कमी का झालं? दुसरं म्हणजे, नाशिकमधील खासदार भारती पवार माझ्याशी सहमत असतील, मी कोणताही राजकीय मुद्दा उपस्थित करत नाहीये. पण किमान हमीभाव इतका का घसरला? मला भारतीय असल्याचा अभिमान आहे, कारण प्रत्येक भारतीयाची भूक भागवली जाते. पण कांद्याचं उत्पादन का घटलं? मला इजिप्शियन कांदा खाण्यात अजिबात रस नाही. भारतीयांनी असं का करावं? आपण तांदूळ, दूध यासारख्या अनेक गोष्टींची निर्यात करतो. आपण गहू-तांदळाचे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उत्पादक आहोत. कांदा उत्पादक हा लहान शेतकरी असतो, त्याच्याकडे पाणी कमी असतं, त्यामुळे त्याला दिलासा द्यायला हवा’ असं सुप्रिया सुळे बोलत होत्या.
सुप्रिया सुळेंच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मंत्री निर्मला सीतारमन उठल्या, तेव्हा एका खासदाराने ‘तुम्ही कांदा खाता का?’ असा प्रश्न विचारला. त्यावर ‘मी इतका लसूण, कांदा खात नाही हो, काळजी करु नका, मी अशा कुटुंबातील आहे, जिथे कांदा लसूण यांना फारसं महत्त्व नाही’ असं सीतारमन (Nirmala Sitharaman after Supriya Sule Questions) म्हणाल्या.
#WATCH: FM Sitharaman says “Main itna lehsun, pyaaz nahi khati hoon ji. Main aise pariwar se aati hoon jaha onion, pyaaz se matlab nahi rakhte” when an MP intervenes&asks her ‘Aap pyaaz khaate hain?’ while she was answering NCP’s Supriya Sule’s ques on production&price of onions. pic.twitter.com/i6OG7GN775
— ANI (@ANI) December 4, 2019
कांद्याच्या वाढत्या किंमतींवरुन बुधवारी लोकसभेत गदारोळ झाला. ‘बाजारात आग लागली आहे सर, सर्व वस्तूंचे भाव वाढत आहेत. भारत सरकार जो कांदा आयात करतो, तो बाजारपेठेत 140 रुपये किलो दराने विकला जात आहे’ असं काँग्रेस खासदार अधीर रंजन म्हणाले. त्यानंतर ‘आपले पंतप्रधान म्हणतात, ना खाणार, ना खाऊ देणार’ असा टोलाही रंजन यांनी लगावला.