सिंधुदुर्ग : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने (Sindhudurga District Court) फेटाळला आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे आणि गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. आमदार नितेश राणे यांना हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, असं असलं तरी नितेश राणे आता उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. नितेश राणे यांच्या वकिलांकडून तशी माहिती देण्यात आली आहे.
नितेश राणे अद्याप पोलिसांसमोर दाखल झालेले नाहीत. मात्र, जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आता नितेश राणे पोलिसांसमोर हजर होणार का? किंवा पोलीस नितेश राणेंना अटक करणार का? असा सवाल केला जात आहे. मात्र, नितेश राणे यांना उच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. जामीन मिळवण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात जाऊ. तोपर्यंत नितेश राणे यांना पोलिसांकडे हजर होण्याची गरज नाही, असं नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी म्हटलंय. मात्र, पोलिसांनी त्यांना अटक केली तर आम्ही जामीनासाठी अर्ज करु असंही त्यांनी म्हटलंय.
आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर स्थानिक शिवसैनिकांकडून जल्लोष व्यक्त केला जात आहे. शिवसेना शाखेसमोर शिवसैनिक मोठ्याप्रमाणात जमले आणि त्यांनी फटाके फोडून कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तर आमदार वैभव नाईक यांनी थेट नारायण राणे यांना आवाहन केलं आहे. नारायण राणे यांनी नितेश राणे यांना पोलिसांसमोर हजर होण्यास सांगावं, असं वैभव नाईक यांनी म्हटलंय.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीदरम्यान संतोष परब यांच्यावर झाला होता. यानंतर संतोष परब यांनी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे. संतोष परब यांच्याबाजून शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. संतोष परब यांच्यावरील हल्ल्यानंतर सध्या राजकीय वादंग पाहायला मिळत आहे. यामुळे पुन्हा एकदा राणे विरुद्ध सेना असा संघर्ष निर्माण झाला आहे.
इतर बातम्या :