मातोश्रीवर पेट्या पोहोचवायचा, तेव्हा राहुल शेवाळेला किती किंमत होती? नितेश राणेंचा सवाल
नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे.
नागपूरः ज्या राहुल शेवाळेंनी (Rahul Shewale) आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले, त्यांना काडीचीही किंमत देत नाही, असे खुद्द आदित्य ठाकरेच (Aditya Thackeray) म्हणाले. त्यांना भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. हे तेच राहुल शेवाळे आहेत, जे काही दिवसांपूर्वी मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमध्ये महत्त्वाचे सदस्य होते. खासदार असताना तेच मातोश्रीवर पेट्या पोहोचवण्याचं काम करत होते, त्यांनीच बाहेर येऊन सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाची खोलवर चौकशी करण्याची मागणी केली आहे, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय.
नागपूरमध्ये विधानभवन परिसरात नितेश राणे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. नितेश राणे, नारायण राणेंनी यापूर्वीदेखील सुशांतसिंग राजपूत, दिशा सालियान आणि रिया चक्रवर्ती प्रकरणी आदित्य ठाकरेंचे संबंध असल्याचा वारंवार आरोप केला आहे.
आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडलेले राहुल शेवाळे यांनीही आदित्य ठाकरेंवर आरोप केले आहेत.
सुशांतसिंग राजपूत प्रकरणी आदित्य ठाकरेंचेच नाव वारंवार घेतले जाते, दुसऱ्या राजकारण्याचा उल्लेख का केला जात नाही? एकाच माणसाचं सातत्याने नाव घेतलं जातं… सुशांतसिंग राजपूत, दिशा सालियान, रिया चक्रवर्ती या प्रकरणात एकाच व्यक्तीचं नाव का येतं?
नारायण राणे, अमित साटम, अतुल भातखळकर आम्ही सगळे तसेच सुशांतसिंगचे फॅन्सही वारंवार सांगत होते.. या प्रकरणाची सविस्तर चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.
नितेश राणे म्हणाले, ‘ हा विषय ज्यांनी लोकसभेत बाहेर काढला, ते खासदार राहुल शेवाळे नेमके कोण आहेत? ते मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमध्ये होते. यांचे लाडके होते. स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून वर्षानुवर्ष काम केलंय.
काल आदित्य ठाकरेंची भूमिका ऐकली. मी त्याला काडीची किंमत देत नाही. स्थायी समिती असताना, खासदार असताना तुमच्या घराकडे पेट्या पोहोचवायचा, तेव्हा राहुल शेवाळेला किती किंमत होती ते सांगा…
त्यांच्या किचन कबिनेटमधला एक जण बाहेर येऊन सांगतोय… रिया चतुर्वेदी आणि त्याच्यात 44 कॉल झाले, त्यात AU म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे आहे.. तर मग याची तर चौकशी झालीच पाहिजे..
आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा…
नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. ते म्हणाले, ‘श्रद्धा वालकर केस मध्ये आफताबची नार्को टेस्ट झाली. तशी आदित्य ठाकरेंची करा. म्हणजे सत्य बाहेर येईल. A फॉर आफताब, ए फॉर आदित्य… सगळ्या विकृतींचं नाव समान झालेलं दिसतंय…
दिशा सालियानची केस आजही मुंबई पोलिसांकडे आहे. सीबीआयकडे नाही. सीबीआय फक्त सुशांतसिंग राजपूतचीच केस तपासतंय. त्यामुळे मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे. ही केस पुन्हा ओपन करण्याची विनंती करणार आहे.
8 आणि 9 जानेवारीला नेमकं काय घडलं, याचा तपास करण्यात यावा…अजूनही दिशा सालियानचा अंतिम पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट बाहेर आलेला नाही, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.