माझं वक्तव्य चुकीचं नाहीच, नितेश राणेंचा धोशा कायम, पुन्हा म्हणाले, जे आमचा सरपंच देतील…
माझ्या पुरस्कृत पॅनलला जे मतदान करतील, निवडून देतील त्यांना भरघोस निधी देणार.. असा पुनरुच्चार राणेंनीन केला.
सिंधुदुर्गः मतदार संघात माझा सरपंच निवडून दिला तरच मी विकास निधी देईन, या नितेश राणेंच्या (Nitesh rane) वक्तव्यानंतर राजकारणात खळबळ माजली आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने (Election Commission) नितेश राणेंच्या वक्तव्याविरोधात कारवाई केली पाहिजे, अशी मागणी होत आहे. मात्र नितेश राणे स्वतःच्या वक्तव्यावर ठाम आहेत. मी कोणतंही चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. माझ्या मतदार संघावर माझा हक्क आहे. त्याच अधिकारातून मी आवाहन केलंय, असे म्हणाले.
आपल्या मुद्द्याचं समर्थन करताना नितेश राणे म्हणाले, ‘ मी त्या वक्तव्यात मांडलेला मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. मतदारसंघातील लोकप्रतिनिधी म्हणून माझा बोलण्याचा अधिकार आहे. माझ्या आणि माझ्या मतदारांमध्ये कोणीही ढवळाढवळ करू नये. माझ्या मतदारांना त्यात काहीही चुकीचं वाटलं नाही.
गल्लीपासून दिल्लीतपर्यंत ज्या पक्षाची सत्ता आहे, त्या पक्षाला मतदान केलं नाही तर विकास कसा होणार? याचं उत्तर विरोधकांनी द्यावं.
खासदार विनायक राऊत हे केंद्रात विरोधीपक्षात आहेत. ते कोणतीही केंद्र सरकारची योजना,निधी आणू शकत नाही. आमदार वैभव नाईक एक रुपयांचा निधी तरी आपल्या मतदारसंघात आणू शकले का? निधी देणारे सर्व मंत्री जर भाजप पक्षाचे असतील तर मी काय चुकीचे बोललो?
पनवेल ते सिंधुदुर्गपर्यंत मी भाजपचा एकमेव आमदार आहे. मग मी माझ्या पक्षाचा लाडका नाही का? माझे नेते माझं ऐकणार नाही का? या सर्वांची जाणीव मी माझ्या मतदारांना करून दिली असेन तर त्यात काही चुकीचं नाही, असं स्पष्टीकरण नितेश राणेंनी दिलंय.
जाहीर सभेत मी असं वक्तव्य केलं असतं तर चुकीचं ठरलं असतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात वैभव नाईक आणि विनायक राऊत यांनी कणकवलीत किती निधी दिला? मी पाठवलेले प्रस्ताव नाकारले जायचे.
मी केलेलया वक्तव्यात काहीच चुकीचं नाही. हक्काने केलेलं वक्तव्य आहे. माझ्या पुरस्कृत पॅनलला जे मतदान करतील, निवडून देतील त्यांना भरघोस निधी देणार.. असा पुनरुच्चार राणेंनीन केला.
वैभव नाईक आणि विनायक राऊत हे विरोधक म्हणून आपलं काम करता आहेत. वैभव नाईकची ओळख राणेविरोधक आमदार अशीच आहे. अडचणीचा प्रश्न विचारल्यामुळे आदित्य ठाकरे पळून गेले. तुम्ही त्यांना असे प्रश्न विचारू नका. लहान मुलांना असे प्रश्न विचारू नयेत, असा टोमणा नितेश राणे यांनी लगावला.