गजानन उमाटे, नागपूरः ज्या करणी सेनेला (Karni Sena) इथला इतिहासच माहिती नाही, त्यांनी चिथावणीखोर वक्तव्य करून शांतता भंग करू नये. तुम्ही आव्हानच देत असाल तर येऊन दाखवा भीमा-कोरेगावात (Bhima Koregaon). इथला विजयस्तंभ पाडूनच दाखवा, आम्हीसुद्धा भीमसैनिक आहोत, असं खुलं चॅलेंज करणी सेनेला देण्यात आलंय. काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी हे वक्तव्य केलंय. येत्या 1 जानेवारीला पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथे शौर्यदिन साजरा केला जातो. मात्र करणी सेनेने यावर आक्षेप घेतला आहे.
करणी सेनेचे अजय सेंगर यांनी याविषयी भूमिका मांडली. इंग्रजांकडून लढलेल्या गद्दार भारतीयांचा शौर्यदिन या देशात कसा काय साजरा होतो, राज्याचे मुख्यमंत्री हे कसं काय सहन करतात, असा सवाल सेंगर यांनी केला.
तर 1 जानेवारी रोजी इंग्रजांविरोधात इथं जे भारतीय लढले, त्यांच्यासाठी श्रद्धांजली सभा घेणार आहोत, कारण गद्दार भारतीयांना अभिवादन करण्यासाठीचा कार्यक्रम भीमा कोरेगाव इथं घेतला जातो. भीमा-कोरेगावातल्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे त्यांनी केली आहे.
अजय सेंगर यांना प्रत्युत्तर देताना नितीन राऊत म्हणाले, इथला विजयस्तंभ पाडण्याची चिथावणी देण्याचं काम केलं जातंय. जरा इतिहास चांगल्या पद्धतीने बघितला आणि समजला पाहिजे. ज्याला इतिहासच माहिती नाही, तो काय शौर्यदिवस घडवणार. पेशवाईच्या विरुद्धचा हा विजय दिवस आहे. त्या दिवशी लाखोंच्या संख्येने भीमसैनिक येतात. तुम्ही अशी चिथावणी देत असाल तर तुम्ही येऊनच दाखवा….
विजयस्तंभ कसे पाडता, ते पाडूनच दाखवा. आम्हीही भीमसैनिक आहोत. बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आमच्यात आहे, असा इशारा नितीन राऊत यांनी दिला.
नागपूरमधील एका घटनेवर नितीन राऊत यांनी आक्षेप घेतला. नाथूराम हिंदुसेना नावाच्या संघटनेनं एक कार्यालय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात उघडलं. त्या ठिकाणी जो भगवा झेंडा होता, त्या ठिकाणी काळ्या रंगात पिस्तुल दिलेलं आहे….
या देशाचा पहिला आतंकवादी ज्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा वध केला, ती प्रवृत्ती या देशात रुजवण्याचं काम या ठिकाणी होणार आहे का? असा सवाल नितीन राऊत यांनी केला.
गृहमंत्र्यांच्या मतदार संघात पोलिसांनी जाऊन तो झेंडा उतरवला. तो बोर्ड उतरवला. पण कुणावरही कारवाई केली नाही. का कुठला प्रकार आहे?
या देशात आपण फुले-शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत. समता पूरक विचारांच्या देशात असं वर्तन खपवून घेणार आहात का? असा सवाल नितीन राऊत यांनी केला.