अजित दादांचा ‘तो’ निर्णय शरद पवारांनी फेटाळला
राष्ट्रवादीच्या झेंड्यासोबत भगवा झेंडाही यापुढे बाजूला लागेल, असं काही दिवसांपूर्वी शिवस्वराज्य यात्रेत अजित पवारांनी जाहीर केलं होतं.
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार या काका-पुतण्यांमध्ये (Sharad Pawar Ajit Pawar) ईव्हीएम मुद्द्यानंतर पुन्हा एकदा मतमतांतर दिसून आलं. राष्ट्रवादीच्या झेंड्यासोबत भगवा झेंडाही यापुढे बाजूला लागेल, असं काही दिवसांपूर्वी शिवस्वराज्य यात्रेत अजित पवारांनी जाहीर केलं होतं. पण हा निर्णय पक्षाचा नसून, ते अजित पवार यांचं वैयक्तिक मत आहे, असं शरद पवार (Sharad Pawar Ajit Pawar) यांनी स्पष्ट केलं.
अजित पवार यांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीमध्येच दोन गट दिसून आले होते. कारण, अजित पवारांच्या या निर्णयावर बोलण्यास राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्ट नकार दिला होता. शरद पवार यांनी याबाबतची भूमिका अद्यापही जाहीर केली नव्हती. पण नाशिकमधील पत्रकार परिषदेत त्यांना प्रश्न विचारला असता, शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली.
शरद पवार काय म्हणाले?
राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा बदलण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. आहे तोच झेंडा राहिल. झेंड्याबाबतचं अजित पवार यांचं मत वैयक्तिक आहे. आता फक्त निवडणूक हेच लक्ष्य असेल, असं शरद पवारांनी जाहीर केलं.
अजित पवार काय म्हणाले होते?
राष्ट्रवादीचे कार्यक्रम आणि सभांमध्ये पक्षाच्या झेंड्यासोबतच भगवा झेंडाही यापुढे असेल, असं अजित पवारांनी शिवस्वराज्य यात्रेत सांगितलं होतं. पण पक्ष स्तरावर याला दुजोरा देण्यात आला नाही. यासोबतच भगवा झेंडा ही कुणाची मक्तेदारी नसल्याचंही राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, अजित पवार आणि शरद पवार यांच्यात मतमतांतर दिसून येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी शरद पवार ईव्हीएम विरोधात देशभरातील नेत्यांना एकत्र आणत होते, तर ईव्हीएममध्ये काहीही दोष नसल्याचं अजित पवार म्हणाले होते. ताजं उदाहरण म्हणजे मोदी सरकारने काश्मीरमधील कलम 370 काढल्याचा पवारांनी विरोध केला, तर अजित पवारांनी निर्णयाचं स्वागत केलं.
VIDEO :