4 वर्षांपासून गाव अंधारात; नाईट लाईफ सुरू करणाऱ्या सरकारकडून थुटानबोरीकरांना उजेडाची अपेक्षा
राज्याच्या उपराजधानीपासून काही किलोमीटर अंतरावर वसलेलं थुटानबोरी गाव मागील 4 वर्षांपासून वीजेशिवायच जगण्याचा संघर्ष करत आहे (Village without electricity in Nagpur).
नागपूर : सध्याच्या काळात अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि रोजगारासह वीजही मुलभूत गरज झाली आहे. त्यामुळे आपल्या घरची एक तास वीज गेली, तरीही जीव अगदी कासाविस होतो. त्यामुळे सलग 4 वर्षे रात्रंदिवस वीजेविना जगण्याची तर आपण कल्पनाही करु शकत नाही. मात्र, राज्याच्या उपराजधानीपासून काही किलोमीटर अंतरावर वसलेलं थुटानबोरी गाव सध्या या जगण्याचा अनुभव घेत आहे (Village without electricity in Nagpur). गेल्या 4 वर्षांपासून या गावातील नागरिक वीजेशिवाय काळोखातच जगत आहेत.
एकिकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडीचं सरकार राज्यातील तरुणांना नाईटलाईफ जगण्याचं स्वप्न दाखवतंय. दुसरीकडे याच राज्यातलं काळं वास्तव समोर येत आहे. हे वास्तव वर्तमान सत्ताधारी आणि मागील सत्ताधारी अशा दोघांच्याही डोळ्यात अंजन घालणारं आहे.
“ना मुलांच्या अभ्यासासाठी वीज, ना दैनंदिन वापरासाठी”
थुटानबोरी गावात 4 वर्षांपासून वीजच नाही. या गावातील प्रकल्पग्रस्तांनी गावं सोडावं म्हणून या गावातील वीज बंद करण्याचं अमानवीय काम प्रशासनानं केलं आहे. गावकरी मात्र आपली जमीन प्रकल्पात न गेल्यानं गाव सोडणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. मात्र, याबदल्यात त्यांना काळोख्या अंधारातच जगण्याचा मार्ग शोधण्याची वेळ आली आहे. गावातील वीज कापल्यापासून येथील लोक रोज दु:ख तुडवत, काळोखात जीवन जगत आहेत. येथे ना मुलांच्या अभ्यासासाठी वीज आहे, ना कशासाठी. साधा मोबाईल चार्जिंग करण्यासाठी देखील येथील लोकांना 10 ते 12 किलोमीटर अंतरावर पायपीट करावी लागते.
“थुटानबोरी गावातील 400 लोकांचं 4 वर्षांपासून वीजेशिवाय अंधारातच जगणं”
थुटानबोरी गावातील काही जमीन गोसीखुर्द प्रकल्पात गेली आहे. पण जवळपास 50 ते 60 एकर जमीन अजूनंही सरकारनं घेतलीच नाही. असं असतानाही प्रशासन मात्र गावकऱ्यांनी गाव सोडावं, पुनर्वसित गावात जावं असा टोकाचा आग्रह करत आहे. गावकरी मात्र पोट भरण्याचं साधन असलेली शेती सोडून जायला तयार नव्हते. यानंतर प्रशासनाने गावकऱ्यांनी गाव सोडावं म्हणून 2015 रोजी गावाचा वीज पुरवठाच तोडला. यानंतरही गावकरी डगमगले नाही. त्यांनी अंधारातच जगण्याचा निर्धार आणि गाव सोडलं नाही. आज 4 वर्षे लोटली असून थुटानबोरी गावातील 400 लोक वीजेशिवाय अंधारातच जगत आहेत.
“वीज नाही म्हणून गावात मुलगी देण्यासंही नकार”
वीजेअभावी गावात पाहूणेही मुक्कामाला येत नाही. वीज नाही म्हणून गावात मुलगी देण्यासंही लोक नकार देतात, अशी गावकऱ्यांची व्यथा आहे. त्यामुळे शहरात नाईटलाईफची योजना ठिक आहे. मात्र, त्यासोबतच थुटानबोरी सारख्या गावांमधील काळोखंही सरकारने बघावा, अशी मागणी गावकरी करत आहेत. तब्बल 4 वर्षे गावातील 400 नागरिक कसे राहत असतील या प्रश्नाचं उत्तर स्वतः गावकरीच देत आहेत. शहरात नाईटलाईफ सुरु होत असताना आमच्यासाठी मात्र, दिवाच जगण्याचा आधार असल्याची भावना हे गावकरी व्यक्त करत आहेत. तसेच मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या जगण्यातील या अंधाराकडेही जरा लक्ष द्यावं, अशी मागणी करत आहेत.
“मुलांचा जन्म आणि त्यांचं बालपणही दिव्याच्या प्रकाशातच”
रिना भारती या 35 वर्षीय थुटानबोरी गावातील रहिवासी आहेत. सध्या त्यांच्या आयुष्यात 2 मुलांचा संसार आणि प्रशासनानं दिलेला काळोखच आहे. रिना भारतींच्या पहिल्या मुलीचा जन्म याच काळोखात झाला. दुसऱ्या मुलीनंही गावातील काळोखाशिवाय दुसरं काहीही पाहिलं नाही. रिना भारती यालाच आपलं नशिब म्हणून दिव्याच्या मदतीनं आयुष्य पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या सुख दु:खात दिव्याचाच आधार झाला आहे. याच दिव्याच्या प्रकाशात स्वयंपाक, याच दिव्याच्या प्रकाशात आजारपण आणि याच दिव्याच्या प्रकाशात मुलांचा जन्म आणि त्यांचं बालपण गेलं.
थुटानबोरीतील गावकऱ्यांच्या जीवनातील काळोखाचे 4 वर्षे लोटले आहेत. या दरम्यानच्या काळात सत्ताही बदलली. मात्र, ढिम्म झालेलं प्रशासन जागं झालं नाही. 5 वर्षे या नागपूर जिल्ह्यानं राज्याला मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री दिले. महाविकास आघाडी सरकारमध्येही नागपूर जिल्ह्याला ऊर्जामंत्री मिळाला. पण थुटानबोरीच्या जनतेचे अश्रू पुसण्यासाठी कुणालाही वेळ मिळाला नाही. त्यामुळेच इथल्या व्यथा कळाव्या म्हणून महाविकास आघाडीत सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांनी या गावात एक दिवस मुक्काम केला आणि इथल्या लोकांचं काळोखातलं जीवन जगून बघितलं.
गावात वीज देणं शक्य नसेल, तर किमान प्रशासनानं शिल्लक राहिलेली शेती विकत घ्यावी. त्यांच्या जगण्याचा आणि उपजीविकेचा प्रश्न मार्गी लावावा. निर्णय घेऊन थुटानबोरीतील लोकांच्या जीवनातील काळोख दूर करावा, असी किमान अपेक्षा होती. पण तसं झालं नाही. गेल्या 6 वर्षांत दोन ऊर्जामंत्री देणाऱ्या नागपूर जिल्ह्यात एक गाव मागील 4 वर्षांपासून अंधारात जीवन जगत आहे. ही बाब ना गेल्या सरकारला शोभणारी होती, ना आताच्या सरकारला शोभणारी आहे. त्यामुळे सरकारने प्रशासनाची मरगळ झटकून यावर उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. आता नव्या आश्वासनांसह विकासाची स्वप्न दाखवणारं महाविकास आघाडी सरकार या गावाकडे लक्ष देऊन तात्काळ मार्ग काढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
व्हिडीओ :