नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक आणि ‘हिंदी हार्टलँड’मध्ये झालेला पराभव या पार्श्वभूमीवर भाजपने आतापासूनच रणनीती आखणं सुरु केलंय. याचाच एक भाग म्हणून भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात राज्यातल्या भाजप खासदारांची बैठक घेतली. परफॉर्मन्स द्या, अन्यथा तिकीट मिळणार नाही, असं शाहांनी बजावल्याची सूत्रांची माहिती आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ही बैठक पार पडली असून निवडणुकीसाठी सज्ज राहा, असं आवाहन अमित शाह यांनी या बैठकीत केलं. या बैठकीत युतीबाबत कुठलीही चर्चा झाली नाही, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली.
बैठकीत अमित शाहांनी अनेक खासदारांची कानउघाडणी केली असल्याची माहिती आहे. लोकांमध्ये मिसळा, तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज राहा, परफॉर्मन्स नसेल तर तिकीट मिळणार नाही, असेही अमित शाहा यांनी खासदारांना बजावलंय.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला. पण या पराभवाने खचून जाऊ नये यासाठी अमित शाहांनी खासदारांना कानमंत्र दिल्याचंही बोललं जातंय. लोकसभा जिंकण्यासाठी महाराष्ट्र हे अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे. त्यामुळे राज्यातल्या खासदारांची शाळा घेणं आतापासूनच सुरु करण्यात आलंय.
उत्तर प्रदेशात लोकसभेचे सर्वाधिक 80 मतदारसंघ आहेत. लोकसभा जिंकण्यासाठी जसं यूपी महत्त्वाचं आहे, तसंच महाराष्ट्राचंही महत्त्व आहे. कारण यूपीनंतर सर्वाधिक 48 मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने अनेक राज्यांमध्ये सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवला होता.
2014 च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युतीने विरोधकांचा सुपडासाफ केला होता. पण यावेळी ही युती होणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे. राज्यात युतीसाठी भाजपकडून वारंवार इच्छा व्यक्त केली जात असली तरी शिवसेनेकडून मात्र स्वबळाचा नारा पुन्हा-पुन्हा दिला जातोय. तर दुसरीकडे विरोधकांनी मात्र महाआघाडी करण्याचा निर्धार केलाय.