मी 99 टक्के नाही, तर 101 टक्के चड्डीवालाच आहे : नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी नागपूरमधील आपल्या भाषणात नागरिकत्व सुधारणा कायद्याचं जोरदार समर्थन केलं (Nitin Gadkari on Chaddiwala Sanghi).
नागपूर : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी नागपूरमधील आपल्या भाषणात नागरिकत्व सुधारणा कायद्याचं जोरदार समर्थन केलं (Nitin Gadkari on Chaddiwala Sanghi). यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीतील काही प्रसंगांचा उल्लेख करताना मी 99 टक्के नाही, तर 101 टक्के चड्डीवालाच असल्याचं वक्तव्य केलं. तसेच संघ हीच जीवन निष्ठा असल्याचंही नमूद केलं (Nitin Gadkari on Chaddiwala Sanghi).
नितीन गडकरी म्हणाले, “मी नागपूरमधून लोकसभा निवडणूक लढत होतो. तेव्हा अनेक मुस्लिमांना मला मतदान करायचं होतं. त्यावेळी ते मला सांगत होते की माझा चड्डी घातलेला फोटो सोशल मीडियावर फिरवला गेला. ते मला विचारायला लागले तर मी त्यांना सांगितलं की मी 99 टक्के नाही, तर 101 टक्के चड्डीवालाच आहे.”
संघ माझी जीवन निष्ठा आहे. नागपूरला माहिती आहे. मागील 50 वर्षात कधीही जातीभेद, अस्पृश्यता पाळली नाही. कोणत्याही धर्मावर अन्याय केला नाही. जर विश्वास असेल तर मतं जरुर मत द्या, नाही द्यायचं दर तो तुमचा अधिकार आहे, असं संबंधित मुस्लिम लोकांना सांगितल्याचं गडकरी म्हणाले.
नागरिकत्व सुधारणा कायद्यावर बोलताना नितीन गडकरी म्हणाले, “पाकिस्तानने स्वतःला मुस्लिम राष्ट्र घोषित केलं तेव्हा महात्मा गांधींनी भारत हिंदू राष्ट्र असणार नाही असं घोषित केलं होतं. तसेच पाकिस्तान, बांग्लादेशमधील अल्पसंख्याकांना जेव्हा गरज लागेल तेव्हा भारत मदत करेल असं आश्वासन दिलं. या कायद्याने तेच केलं आहे.”
“मुस्लिम शरणार्थींना 100 ते 150 देश उपलब्ध आहेत”
मुस्लिम शरणार्थींना जगात 100 ते 150 देशांचे पर्याय आहेत. मात्र, हिंदू, बौद्ध, इसाई, पारशी लोकांसाठी भारत हाच पर्याय आहे, असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, “हिंदू ही जीवन जगण्याची पद्धत आहे. हिंदू धर्म सर्व धर्मांचा, सर्व ईश्वरांचा सन्मान करण्यास शिकवतो. हिंदूंना जातीवादी म्हणणाऱ्यांनी हे समजून घ्यावं. मी देशातील मुस्लिमांना आश्वासन देतो, आमच्या संघाच्या गुरुंनी आम्हाला कधीही मुस्लिमांचा द्वेष करायला शिकवला नाही. संघाचे बाळासाहेब देवरस यांनी समाजातील अस्पृश्यता आणि जाती भेदाला सर्वात वाईट गोष्ट म्हटलं.” भारतातील मुस्लिमांना बाहेर देशात गेल्यावर हिंदू म्हणूनच ओळखलं जातं, असंही यावेळी ते म्हणाले.
“पाकिस्तानमध्ये 22 टक्के हिंदू होते, आज 3 टक्के झाले”
पाकिस्तानमध्ये हिंदूंचा छळ होते. त्यांच्यावर अत्याचार होतो, त्यामुळे त्यांना देश सोडावा लागतो. जयपूरमध्ये हिंदू शरणार्थी होते, ते करोडपती होते. मात्र, जीव वाचवण्यासाठी त्यांना पाकिस्तान सोडून इकडं पळून यावं लागलं होतं. आधी पाकिस्तानमध्ये 22 टक्के हिंदू होते. आज 3 टक्के झाले आहेत. अनेकांचं धर्मांतरण झालं, असा आरोप नितीन गडकरी यांनी केला.
पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये फरक असल्याचं सांगत गडकरींनी आमच्या सरकारने 250 कोटी खर्च करुन बांग्लादेशसाठी जलमार्ग बनवून दिल्याचंही नमूद केलं.