मुंबई : अंधेरी पोट निवडणुकीत चिन्हापासून ते निवडणुक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नाट्यमय घडामोडी पहायला मिळाल्या. अखेरीस भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी निवडणुक अर्ज मागे घेत माघार घेतली असली तरी वाद कायम आहे. मुरजी पटेल यांनी माघार घेतल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. मुरजी पटेलांच्या माघारीनंतर ऋतुजा लटकेंच्या विरोधात वेगळीच खेळी खेळली जात असल्याचा आरोप आहे.
या वादाशी निगडित एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. ठाकरे गटा विरोधात ‘नोटा’च्या बटणाचा प्लॅन बनवला जात असल्याचा दावा केला जात आहे.
या व्हायरल क्लिपमध्ये ‘नोटा’ला मतदान करण्याचं आवाहन केले जात आहे. या ऑडिओ क्लीपमधील आवाज हा मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्याचा असल्याचा दावा केला जात आहे.
3 तारखेला ऋतुजा लटकेंच्या विरोधात वेगळीच खेळी आखली जात असल्याचे या कार्यकर्त्याच्या बोलवण्यावरुन समजत आहे. भाजपच्या मुरजी पटेलांच्या माघारीनंतर ‘नोटा’तून रोष व्यक्त केला जात असल्याचे दिसत आहे.
या निवडणुकीत काका नाही. कमळाचे चिन्ह नाही पण नोटा चे बटन आहे. ‘नोटा’द्वारे रेकॉर्ड मतदान करण्याचं आवाहन या क्लीपमध्ये करण्यात आले आहे.
या पोट निवडणुकीसाठी एकूण 14 जणांनी अर्ज भरले होते. त्यातील 7 जणांनी माघार घेतली आहे. 7 जणांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे निवडणुक होणारं असल्याचं स्पष्ट झालं आहे.
ऋतुजा लटकेंसह सहा उमेद्वार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.