धीरज देशमुख यांच्यानंतर ‘नोटा’ला पसंती, लातुरात असं का घडलं?
नुकतेच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये सर्वांना आश्चर्यचकित करणारा निकाल पाहायला मिळाला आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघात काँग्रेस विजयी झाली.
लातूर : नुकतेच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये सर्वांना आश्चर्यचकित करणारा निकाल पाहायला मिळाला आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघात काँग्रेस विजयी झाली. तर दुसऱ्या क्रमांकावर चक्क नोटाचा (NOTA second rank in latur rural constituency) क्रमांक लागला आहे. नोटाला तब्बल 27 हजार 327 मतं पडली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात लातूर ग्रामीण मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदावर तिसऱ्या क्रमांकावर (NOTA second rank in latur rural constituency) आहे.
लातूरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटाचे मतदान झाल्यामुळे याचीच चर्चा सध्या जोरदार होत आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेस तिसऱ्यांदा विजयी झालेली आहे. यावेळ काँग्रेससमोर भाजपने मोठे आव्हन निर्माण केलं होते. सलग दहा वर्षे भाजपचे रमेश कराड या मतदारसंघात लोकांमध्ये वावरत आहेत. कोणत्याही परिस्थितीत यावेळची निवडणूक जिंकायची यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी केली होती.
यानंतर अचानक लातूर ग्रामीण मतदारसंघ शिवसेनेला सुटला आणि भाजपचा मोठा गट संतप्त आणि नाराज झाला. त्यातच निवडणुकीच्या पंधार दिवस अगोदर शिवसेनेत प्रवेश केलेल्या सचिन देशमुख यांना तातडीने उमेदवारी देण्यात आली. विशेष म्हणजे इथे शिवसेनेचे मोजून दोनशे कार्यकर्ते सापडणार नाहीत, अशी जागा शिवसेनेला का सोडली, असा प्रश्न तेथील स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. तसेच भाजपच्या रमेश कराड यांना अडचणीत आणण्यासाठी हे कारस्थान करण्यात आलं आहे, असंही कार्यकर्ते म्हणाले.
लातूर ग्रामीणमधून शिवसेनेला उमेदवारी देण्यात आल्यामुळे त्यांना हरवण्यात आल्याची चर्चा सध्या मतदारसंघात सुरु आहे. तसेच या मतदारसंघात रामदेव बाबा प्रचाराला येणार, अशी क्लिपही व्हायरल झाली होती. मात्र आपण विजयी होऊ असं कुठेच युतीच्या कार्यकर्त्यांना वाटत नव्हते.
युतीचा उमेदवार निवडून येणार नाही हे लक्षात आल्यानंतर भाजपच्या गटाने मोठ्या प्रमाणात नोटाचा प्रचार सुरु केला. हा प्रचार एवढा जोरात होता की नोटा किमान 40 हजारवर जाईल, अशी स्थिती वाटत होती. पण नोटा मतदानाने अखेर 27 हजार 327 मते घेतली. काँग्रेसचे धीरज देशमुख लाखांच्या मतांनी निवडून आले. मात्र दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या नोटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.