क्रिकेट मॅचवरुन राजकारण करणारी राजकीय मंडळी क्रिकेटच्या संस्थांच्या निवडणुका लागल्या एकत्र येतात आणि…
आता क्रिकेटला सुद्धा भारतात सणाइतकचं महत्व असल्यामुळे क्रिकेटही राजकारणात ओढला गेला आहे.
मुंबई : भारत-पाकिस्तानच्या सामन्यानंतर आता शिंदे विरुद्ध ठाकरे सामना सुरु झाला आहे. याआधी सत्तास्थापनेवेळी मुख्यमंत्री शिंदे म्हटले होते की कामाख्या देवीनं कुणाचा बळी घेतला? त्यानंतर शिंदे दसऱ्याला म्हटले की आम्ही दसऱ्याआधीच विजयादशमी साजरी केली. आता शिंदेंनी त्यांच्या सत्तांतराची तुलना भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याशी केली आहे. ज्यावरुन मैदानात गाजवलेला पराक्रम वेगळा आणि मैदान सोडून केलेली गद्दारी वेगळी., अशी टीका ठाकरे गटानं सुरु केली आहे.
मॅच आणि राजकारणात हा वाद इथंच थांबलेला नाहीय., तो आता प्रत्यक्ष परदेशातल्या खेळपट्ट्यांवरही पोहोचला आहे. गेल्या महिन्यात सिडनीत झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात काही मराठी प्रेक्षकांनी ”पन्नास खोके, एकदम ओके” चं पोस्टर झळकावलं होते. कालच्या सामन्यात दिव्यातील एका प्रेक्षकाने मेलबोर्नच्या खेळपट्टीवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचं पोस्टर दाखवलं.
यातली गंमत म्हणजे ज्या क्रिकेटच्या मॅचवरुन राजकीय टीका होतायत.,त्याच क्रिकेटच्या संस्थांच्या जेव्हा प्रत्यक्ष निवडणुका लागतात, तेव्हा मात्र सर्व राजकीय मंडळी एक होतात.
राष्ट्रवादी आणि भाजप राजकीय विरोधक आहेत. वैचारिक विरोधातूनच शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे असे दोन गट पडले आहेत. भाजप सुद्धा ठाकरे गटाच्या विरोधात आहे.
राजकीय खेळपट्टीवर हे सर्व नेते एकमेकांच्या धोरणांवर, विचारांवर सडकून टीका करतात. मात्र, जेव्हा MCA सारख्या प्रत्यक्ष क्रिकेट संस्थांच्या निवडणुकांचा विषय येतो. तेव्हा राष्ट्रवादी-भाजप-शिवसेना आणि शिंदे गट हे चारही पक्षांचे प्रतिनिधी एकाच पॅनलमध्ये उभे राहतात आणि एकमेकांच्या पाठिंब्यानं निवडूनही येतात.
या चारही पक्षांचे सदस्य असणाऱ्यांच्या पॅनलविरोधात मूळ क्रिकेटर असलेले संदीप पाटील पराभूत झाले. याआधी जेव्हा दसरा झाला होता., त्याच दसऱ्यावरुनही ठाकरे आणि शिंदेंमध्ये वाक्युद्ध रंगलं.
उद्धव ठाकरेंनी खोकासुराचा वध करायचाय., म्हणून शिंदें गटावर निशाणा साधला. त्याला उत्तर देताना शिंदेंनी आम्ही कधीच विजयादशमी साजरी केल्याचं म्हटलं.
महाराष्ट्राच्या सत्ताबदलानंतर 4 सण आलेत. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्री आणि आता दिवाळी. या चारही सणांवरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. आता क्रिकेटला सुद्धा भारतात सणाइतकचं महत्व असल्यामुळे क्रिकेटही राजकारणात ओढला गेला आहे.