आता मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षात संघर्ष? एनडीएमध्ये पुन्हा बिघाडी
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप युतीचे सरकार आहे. मात्र असे असले तरी या युतीमध्ये मतभेद आहेत. एकामागून एक हे मतभेद समोर येत आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तुलनेने खराब कामगिरीनंतर सुरू झालेला युतीमधील कलह आता वाढतच चालला आहे.
राज्यात ऑक्टोबर महिन्याच्या आसपास विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे महायुतीमधील पक्षांमध्ये जागावाटपावरून हा संघर्ष अधिकच गडद होताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे गट आणि अजितदादा गटामध्ये संघर्ष झालेला पहायला मिळत होता. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी अजितदादा सत्तेत जरा उशिरा आले असले तरी चालले असते असे विधान करून एकच खळबळ माजविली होती. त्यावरून दोन्ही बाजूनी आरोप प्रत्यारोप झाले. हा वाद निवळत नाही तोच पुन्हा शिंदे आणि अजितदादा गटामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीवरून वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी एक मोठे विधान केले आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण संगमेश्वर विधानसभेच्या जागेवर आपला दावा सांगितला आहे. विशेष म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या छावणीत दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम यांनी या जागेवरून निवडणूक जिंकली होती. शिवसेनेचे सदानंद चव्हाण यांचा त्यांनी पराभव केला होता. मात्र, आता पराभूत चव्हाण यांच्या दाव्यानंतर सत्ताधारी आघाडीत जागावाटपावरून संघर्ष होण्याची भीती अधिक गडद झाली आहे.
माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी, “आमची भाजप आणि शिवसेनेसोबत युती होती. पण, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस त्यात सामील झाली. शेखर निकम हे इथले आमदार असले तरी या जागेवरून शिवसेनेचा आमदार निवडून यावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. चिपळूणची जागा शिवसेनेला मिळणार नाही अशी शक्यता त्यांनी फेटाळून लावली. तसेच, येथून निवडणूक लढविण्यास आपण इच्छुक आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जागा वाटपनुसार ही जागा राष्ट्रवादीला मिळाली तरी आमदार शेखर निकम यांना सदानंद चव्हाण यांचे आव्हान असणार आहे.
महायुतीमधील हा संघर्ष केवळ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच नाही. याआधीही भाजप शिवसेनेतील मतभेदही चव्हाट्यावर आले होते. लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून अल्प मतांनी विजयी झाले होते. नारायण राणे यांचे पुत्र नितीश राणे यांनी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांना त्यांच्या भागातील मते मिळाली नाहीत असा अरोप त्यांनी केला होता. उदय सामंत यांच्या मतदारसंघातून राणे यांना मतांची आघाडी मिळाली नाही त्यामुळे नितीश राणे आणि उदय सामंत यांच्यात वाद झाला होता.