आडनावावरून चुकीचे आकडे आले तर ओबीसींना फार मोठा अडचणीचा विषय ठरेल : छगन भुजबळ
राजकीय आरक्षणासाठी नाही याचा उपयोग पुढे शिक्षण व नोकरी आरक्षणावर याचा फार मोठा परिणाम होणार आहे. त्यासाठी याचं योग्य परीक्षण झालं पाहिजे. योग्यरितीने डाटा निर्माण झाला पाहिजे अशी सर्वांची मागणी आहे.
मुंबई : ओबीसी इम्पिरिकल डेटाबाबत (Imperial Data) वर्तमानपत्रात जे रिपोर्ट आले आहेत ते थोडे धक्कादायक आहेत. आडनावावर जाऊन घरात बसून कोण माहिती घेत असेल तर हे चुकीचे आहे. तसेच चुकीचे आकडे येतील आणि हे चुकीचे आकडे केवळ या आरक्षणासाठी (OBC Reservation) नाही तर सर्वप्रकारच्या पुढच्या आरक्षणासाठी धोकादायक ठरतील. तर हे आकडे ओबीसींवर फार मोठ्या अडचणीचा विषय ठरेल. ओबीसींची कत्ल होऊन जाईल अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केली. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनता दरबारात माध्यमांशी बोलत होते.
ओबीसी समाज 54 टक्के
डाटाबाबत खोलात जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत. सॉफ्टवेअर कंपन्यांकडून आऊटसोर्सिगचे जे काम करण्यात आले. त्याप्रमाणे त्या सॉफ्टवेअर कंपन्यांना ज्या सूचना दिल्या आहेत, त्याप्रमाणे त्या काम करत आहेत. कुणी तशा सूचना दिल्या असतील की ही नांवे या समाजाची ही नांवे या समाजाची वगळा तर हे चुकीचे होणार आहे. हे ऐकत आहे. प्रत्येक वेळी सिध्द झाले आहे की ओबीसी समाज 54 टक्के आहे. पवारसाहेबांनी मंडल आयोग दिला त्यावेळेपासून आहे. पण त्यानंतर 2004 पासून कुणबी मराठा, मराठा कुणबी हे सुद्धा ओबीसीत आले. त्यावेळी अडीचशे जाती होत्या आता सव्वाचारशे जाती झाल्या आहेत. त्यामुळे राज्यात ओबीसीमधील जाती कमी होण्याचा संबंध येत नाही. उलट वाढतील पण कमी होणार नाही. कारण मराठा समाजात अर्धे कुणबी समाजाचे आहेत. मग प्रश्न असा येतो की आकडे कमी कसे येतात. त्या कंपन्यांना जे सांगितले असेल तर तिथपर्यंत जाणार आहे. तुम्ही मतदारांची जी यादी घेऊन एक ते दोन दिवसात गावात जाऊन ज्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, तलाठी आहेत त्यांनी माहिती घ्यायची आहे.
योग्यरितीने डाटा निर्माण झाला पाहिजे
राजकीय आरक्षणासाठी नाही याचा उपयोग पुढे शिक्षण व नोकरी आरक्षणावर याचा फार मोठा परिणाम होणार आहे. त्यासाठी याचं योग्य परीक्षण झालं पाहिजे. योग्यरितीने डाटा निर्माण झाला पाहिजे अशी सर्वांची मागणी आहे. याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाही पत्र दिले आहे असेही छगन भुजबळ म्हणाले.
ओबीसी कार्यकर्ते आहेत, संघटना आहेत, नेते आहेत त्यांनी गावागावात जाऊन मतनोंदणी केली जाते तसं ओबीसी डाटा गोळा करत आहेत त्यांच्यासोबत जाऊन हा योग्य डाटा आहे की नाही हे पहावे असे आवाहनही छगन भुजबळ यांनी केले. तसेच विरोधी पक्षनेते बोलतात तेव्हा ते चेक करण्याचे काम यंत्रणांनी पडताळून पहावे. राजकारणातील गोष्टी असत्या तर मी सांगितलं असतं की सोडून द्या. परंतु हा ओबीसींच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी केलेले आरोप खरे की खोटे हे यंत्रणांनी पडताळून पहावे असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.
काय गौडबंगाल आहे
पाच टक्के, दहा टक्के ओबीसी आहेत, असे सांगितले जात आहे. या मुंबईतील झोपडपट्टीमध्ये उच्चवर्णीय रहात नाहीत. दलित किंवा ओबीसी समाजाचे लोक रहातात. बहुसंख्य मुस्लिम हे ओबीसी आहेत. त्यात थोडे लोक उच्चवर्णीय आहेत. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार येथून जे लोक आले आहेत. त्यामध्ये कुशवाह, सैनी आहेत. हे कोण आहेत हे सगळे ओबीसी आहेत. त्यांना तुम्ही घेणार नाही असं कसं चालेल. त्यांचे मतदानकार्ड आहे, रेशनकार्ड आहे. सरकारच्या ज्या योजना आहेत त्यातील लाभ घेण्याच्या यादीत त्यांची नांव आहेत. ओबीसीमध्ये का नावे घेणार नाही, ती घेतली पाहिजेत. मोठ्या शहरात ओबीसी संख्या पाच आणि दहा टक्के लिहिली जातेय हे तुम्ही जर सांगता ते खरं असेल तर ते धक्कादायक आहे. यामागे काय गौडबंगाल आहे याचे सरकारमधील वरीष्ठांनी शोधून काढले पाहिजे असेही छगन भुजबळ म्हणाले.
पवारसाहेबांचा लोकांमध्ये मिसळण्याचा स्वभाव
राष्ट्रपती निवडणूकीत संख्याबळ कमी की जास्त हा मुद्दा महत्त्वाचा नसून त्याहीपेक्षा पवारसाहेबांचा हे राष्ट्रपती पद घ्यायचं आणि त्या भवनात थांबायचं हा त्यांचा मुळचा स्वभाव नाही. त्यांचा लोकांमध्ये मिसळण्याचा, त्यांचा स्वभाव आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांच्याकडे लोकं येतच असतात आणि ते एका ठिकाणी कधी सापडणार नाहीत. कधी शेतकऱ्यांसोबत तर कधी डॉक्टरांसोबत सतत त्यांचे कार्यक्रम सुरू असतात. त्यांना चॉईस आहे की हे काम आवडेल की नाही मात्र वर्तमानपत्रात जे काही आले आहे, त्यावरुन पवारसाहेबांनी त्या गोष्टीला साभार नकार दिला आहे असं दिसतं असेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.