अजित पवारांना देवगिरी, गुलाबराव पाटलांना क 8 बंगला, ‘मातोश्री’वर राहणाऱ्या आदित्य ठाकरेंना कोणता बंगला?
ठाकरे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्याचं लक्ष खातेवाटपाकडे लागलं आहे. खातेवाटप आज होईल असं सांगण्यात येत आहे. मात्र तत्पूर्वी मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचं वाटप (Ministers bungalow) झालं आहे.
मुंबई : ठाकरे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्याचं लक्ष खातेवाटपाकडे लागलं आहे. खातेवाटप आज होईल असं सांगण्यात येत आहे. मात्र तत्पूर्वी मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचं वाटप (Ministers bungalow) झालं आहे. गेल्या महिन्यात चार मंत्र्यांना बंगल्यांच वाटप झाल्यानंतर, आता विस्तारानंतर सर्वांना बंगले (Ministers bungalow) मिळाले आहेत.
सरकारी बंगले वाटपानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाट्याला देवगिरी बंगला आला आहे. तर अशोक चव्हाण यांना मेघदूत, दिलीप वळसे पाटील यांना शिवगीरी, अनिल देशमुख यांना ज्ञानेश्वरी, डॉ. राजेंद्र शिंगणे-सातपुडा आणि राजेश टोपे यांना जेतवन हे बंगले मिळाले आहेत.
ठाकरे सरकारमधील पहिल्या विस्तारात शपथ घेणाऱ्या सर्व 36 जणांना सरकारी बंगल्यांचं वाटप झालं आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वर्षा तर छगन भुजबळ यांना रामटेक, जयंत पाटील यांना सेवासदन आणि एकनाथ शिंदे यांना रॉयलस्टोन हे बंगले मिळाले आहेत.
सत्ताकेंद्र असलेल्या ‘मातोश्री’वर राहणारे आदित्य ठाकरे यांना अ-6 निवासस्थान मिळालं आहे. बच्चू कडू यांना रॉकिहिल टॉवर 1202, विश्वजीत कदम यांना निलांबरी 302, सतेज पाटील यांना सुरुची-3, आदिती तटकरे यांना सुनिती -10 हे निवासस्थान मिळालं आहे.
देवेंद्र फडणवीसांना सागर बंगला
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता विरोधी पक्षनेते झाले आहेत. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेत्याचा बंगला मिळाला आहे. गेल्या महिन्यात देवेंद्र फडणवीस यांना सागर हा बंगला मंजूर झाला. हा बंगला मलबार हिल परिसरातच आहे. माजी कृषीमंत्री अनिल बोंडे हे सागर या निवासस्थानी वास्तव्यास होते.
संबंधित बातम्या
‘नकोसा’ रामटेक भुजबळांच्या वाट्याला, मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचं वाटप!