Politics : बंडखोर आमदारांच्या कार्यालयात ठाकरे कुटुंबियातील एकालाच स्थान, केसरकरांनीही घेतला निर्णय..!
आता बदलत्या राजकीय स्थितीनुसार हा बदल होत आहे. पण जनता हा बदल स्वीकारेल का हे देखील पाहणे महत्वाचे राहणार आहे.
सिंधुदुर्ग : (Rebel MLA) बंडखोरीनंतर शिवसेनेशी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी कटुता न घेता त्यांच्याशी संबंध हे सुधारण्याचा सर्वच आमदारांनी प्रयत्न केला होता. आता शिंदे गट आणि (Shiv sena) शिवसेना हे एकत्र येण्याची सूतभरही शक्यता नसल्याने बंडखोर आमदार त्यापद्धतीने निर्णय घेत आहेत. कधीकाळी शिवसेना आमदारांच्या कार्यलयात (Balasaheb Thackeray) शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हे ठरलेलेच होते. पण आता यामध्ये बदल होत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या फोटोची जागा आता मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांच्या फोटोने घेतली आहे. यापूर्वी हा बदल औरंगाबादमध्ये समोर आला होता तर आता सिंधुदुर्गातील दीपक केसरकर यांच्या कार्यालयातही हा बदल दिसून येत आहे.
बाळासाहेबांचे विचार जोपासण्यासाठी या आमदारांनी बंडखोरीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ठाकरे कुटुंबातील इतरांचे छायाचित्र हलवून त्याठीकाणी केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोलाच स्थान देण्यात आले आहे. चार महिन्यानंतर हा बदल केसरकर यांनी आपल्या कार्यालयाच्या फलकावर केला आहे.
पूर्वीच्या फलकावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची छायाचित्र हे ठरलेली असायची. आता बंडखोर आमदरांच्या कार्यालयावरील फलकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी,आनंद दिघे यांचे फोटो आहेत.
कार्यालयाच्या फलकावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो ठेऊन आपण शिवसेनेशी आणि बाळासाहेबांच्या विचाराशी प्रमाणिक असल्याचे सांगण्याचा प्रयत्न ह्या आमदारांनी केला आहे. शिवाय शिंदे सेना हीच खरी शिवसेना असा दावाही या आमदरांकडून केला जात आहे.
दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी कार्यालयाच्या फलकावर बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो लावले होते. आता बदलत्या राजकीय स्थितीनुसार हा बदल होत आहे. पण जनता हा बदल स्वीकारेल का हे देखील पाहणे महत्वाचे राहणार आहे.