Opposition Leader : अजित पवार विरोधी पक्षनेते होण्याची शक्यता, शरद पवारांनी निवडीची जबाबदारी दिली 4 नेत्यांना, बैठकीतली इनसाईड स्टोरी
थोड्यात वेळात राष्ट्रवादीची पत्रकार परिषदही होणार आहे. या पत्रकार परिषदेतही विरोधी पक्षनेत्याची घोषणा होऊ शकते.
मुंबई : विधानसभेच्या विरोधी (Opposition Leader) पक्षनेत्याची घोषणा ही आजच होण्याची शक्यता होती. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आमदारांची बैठक घेतली. या बैठकीनंतर ही घोषणा होण्याची शक्यता होती. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची 6 ते 7 राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक पार पडल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत शरद पवार यांची बैठक पार पडली आहे. बैठकीत प्रामुख्याने विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठीचा उमेदवार ठरवण्यात येणार होता. या पदासाठी राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar), जयंत पाटील यांच्या नावांची चर्चा झाली. याच बैठकीत अनेक आमदार अजित पवार यांना विरोधीपक्षनेता करावं असा प्रस्ताव ठेवणार अशीही माहिती समोर आली होती. त्या अनुषंगाने चर्चाही झाली आहे, त्यामुळे अजित पवार हेच विरोधी पक्षनेते होण्याची दाट शक्यता आहे.
चार नेत्यांकडे विरोधी पक्षनेते निवडण्याची जबाबदारी
विरोधी पक्षनेते निवडीची जबाबदारी शरद पवारांनी चार नेत्यांवर सोपवली आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार, जयंत पाटील, हसन मुश्रीफ आणि सुनील तटकरे यांनी एकत्र बसून नाव निश्चित करण्याचे शरद पवारांनी आदेश दिले आहेत, त्यामुळे उद्या सकाळपर्यंत नाव फायनल होणार आहे.
अजित पवारांना जास्त आमदारांचा पाठिंबा
अजित पवार यांना सध्या तरी जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचे चित्र दिसत आहे. सरकारमध्ये असतानाही अजित पवारांच्या दौऱ्यांचा, कामाचा आणि भाषणांचा बोलबाला राहिला आहे. तसेच अजित पवारांचं आजचं विधानसभेतलं भाषणही चांगलेच गाजले आहेत. अजित पवारांना विधीमंडळाच्या कामकाजाचा दीर्घ अनुभव आहे. सरकारला घाम फोडण्याची ताकद ही अजित पवार यांच्यात असल्याचे अनेक आमदारांचे मत आहे. तसेच विविध खात्यांच्या कामांचा अनुभव हा अजित पवारांच्या कामी नक्कीच येणार आहे. अजित पवारांची शिस्तही सर्वांनाच भावते, कधी कधी ते एखाद्या सभेच्या स्टेजवरून आपल्याच कार्यकर्त्यांना खडे बोलही सुनावताना दिसून येतात. त्यामुळे अजित पवारांचा हा धडाडीपणा आणि अनुभव पाहून त्यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडणार का? हे लवकच स्पष्ट होणार आहे.
जयंत पाटील यांचंही पारडं जड
तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेही पारडं या पदासाठी जड मानलं जात आहे. जयंत पाटलांनीही गेल्या अनेक वर्षाच्या राजकीय अनुभवात अनेक मोठी पदं भुषवली आहेत. त्यांनाही विधीमंडळाच्या कामकाजाचा सुक्ष्म अनुभव आहे. तसेच जयंत पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या सर्वात जवळचे नेते मानले जातात. सर्वात विश्वासू सहकारी तसेच अभ्यासू व्यक्तिमहत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. जयंत पाटील हे एक संयमी राजकारणी आहेत. तसेच विधानसभेतील त्यांची विरोधकांना चिमटे काढणारी भाषणंही बरीच व्हायरल होतात. विरोधकांना चिमटीत कसं पकडायचं याचा अंदाज जयंत पाटील यांनाही चांगलाच आहे.