मुंबई : दररोज वेगवेगळ्या विषयांवरील निर्णयांचा धडाका लावणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भीमा कोरेगाव प्रकरणातील गुन्ह्यांबाबतही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे (CM Uddhav Thackeray on Bhima Koregaon cases). मागील सरकारने भीमा कोरगाव प्रकरणाबाबत जे आदेश दिले आहेत त्याची अंमलबजावणी झाली आहे की नाही हे तपासलं जात आहे. त्या आदेशांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली (CM Uddhav Thackeray on Bhima Koregaon cases). ते कॅबिनेट बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “भीमा कोरेगाव प्रकरणात ज्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे नाहीत त्या सर्वांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश गेल्या सरकारने दिले आहेत. त्या आदेशांची अंमलबजावणी झाली की नाही हे तपासण्याचे आदेश मी दिले आहेत. त्याप्रमाणे त्या निर्णयाची अंमलबजावणी होईल.”
भीमा कोरेगाव दंगलीत सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांविरुद्ध तत्कालीन भाजप सरकारने हेतुपुरस्सर नोंदवलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली. भाजप सरकारच्या अत्याचारात बळी ठरलेल्यांना न्याय देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी करावे.#BhimaKoregaon @CMOMaharashtra pic.twitter.com/Jve8fMVw1r
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 3, 2019
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह धनंजय मुंडे यांनी भीमा कोरेगावचं प्रकरणं लावून धरलं आहे. धनंजय मुंडे म्हणाले, “भीमा कोरेगाव दंगलीत सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांविरुद्ध तत्कालीन भाजप सरकारनं हेतुपुरस्सर नोंदवलेले गुन्हे मागे घ्यावेत. भाजप सरकारच्या अत्याचारात बळी ठरलेल्यांना न्याय देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी करावं.”
आरे चे आंदोलन करणारे सुटले …. #भिमाकोरेगाव मध्ये खोटे गुन्हे दाखल केले मागच्या सरकारनी
आता ह्या माझ्या सरकारनी ते गुन्हे मागे घ्यावेत @OfficeofUT @Jayant_R_Patil
होय … हे आपले सरकार …#MahaVikasAghadi— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 1, 2019
जितेंद्र आव्हाड म्हणाले होते, “आरेसाठी आंदोलन करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात आले. ते आंदोलक सुटले. भीमा कोरेगावमध्ये मागील सरकारने खोटे गुन्हे दाखल केले. आता माझ्या या सरकारने ते गुन्हे मागे घ्यावेत. होय हे आपलं सरकार.”
“विकास कामांना स्थगिती नाही, बुलेट ट्रेनवर अद्याप निर्णय नाही”
उद्धव ठाकरे म्हणाले, “आमच्या रोज बैठका सुरु आहेत. वेगवेगळ्या विकास कामांचा आढावा घेतला जातो आहे. विकास कामाला कुठेही स्थगिती दिलेली नाही. विकास कामांची माहिती मागवली जात असून त्यांना गती देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आम्हाला राज्यात इतर काही विकास कामं करायची आहेत. या विकास कामांचा मागील विकास कामांमध्ये समावेश करण्याचाही प्रयत्न असेल.”
बुलेट ट्रेनबाबत आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. जे इतर विकास कामं सुरु आहेत त्यांना मी स्थगितीचे आदेश दिलेले नाही. केवळ आरे कारशेडलाच स्थगिती दिली आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.
“विकास कामे पूर्ण करताना प्राधान्यक्रम ठरवावा”
उद्धव ठाकरे म्हणाले, “राज्यात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास कामांना थांबवणार नाही. उपलब्ध निधी पाहता त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून ही कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. जेणे करून सामान्य जनतेला त्याचा वेळीच लाभ घेता येईल.”
मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी मेट्रो, मुंबई, ट्रान्स हार्बर लिंक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, समृद्धी महामार्ग या प्रकल्पांच्या कामाचाही आढावा घेतला. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, छगन भुजबळ, जयंत पाटील यांच्यासह मुख्य सचिव अजोय मेहता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
“विकास कामांचा स्थानिकांना किती फायदा याचा प्रामुख्याने विचार करणार”
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “पायाभूत सुविधांसाठी असलेल्या विकास कामांच्या आड आम्ही येणार नाही. मात्र उपलब्ध निधी आणि त्याचा विनियोग आणि स्थानिकांना त्याचा होणारा लाभ या सर्व बाबींचा विचार केला जाईल. या पायाभूत सुविधांच्या कामांचा प्राधान्यक्रम त्याप्रमाणेच ठरवणे आवश्यक आहे. सध्या सुरु असलेल्या विविध पायाभूत सुविधांच्या विकास कामांना थांबवणार नाही.”
“कामाची प्रगती आणि निधी याचा ताळमेळ घालणं आवश्यक”
कुठलाही विकास प्रकल्प राबवताना स्थानिक लोकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. प्रशासनामार्फत तळमळीने काम केलं जातं. मात्र कामाची प्रगती आणि निधी याचा ताळमेळ घालणंही आवश्यक आहे. मेट्रोसाठी ठिकठिकाणी आवश्यक असणाऱ्या कारशेडच्या उभारणीबाबत स्थानिकांना विश्वासात घेऊन मार्ग काढण्यात येईल. त्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगतानाच विकास कामांसाठी एक पाऊल उचलताना पुढच्या शंभर पावलांचा धोका ओढावून घेतोय का याचाही विचार केला पाहिजे, असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी नमूद केलं.
समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात देखील समृद्धी आली पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. यावेळी मुंबई मेट्रो, नवी मुंबई विमानतळ, समृद्धी महामार्ग, एमटीएचएल या कामांबद्दल सादरीकरण करण्यात आलं.
संबंधित बातम्या:
“आरेचं झालं, आता माझ्या सरकारनं भीमा कोरेगाव प्रकरणातील खोटे गुन्हे मागे घ्यावेत”
भीमा कोरेगाव : डॉ. आनंद तेलतुंबडेंना सोडण्याचे पुणे कोर्टाचे आदेश
आरे कारशेडला स्थगिती, एक पानही तोडणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय
मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत उद्धव ठाकरेंकडून ‘हे’ महत्त्वाचे निर्णय