मराठवाड्यात काय घडतंय? गुणरत्न सदावर्तेंचे बॅनर्स का फाडले? उस्मानाबादच्या कार्यक्रमावरून वाद
कष्टकऱ्यांचा आवाज सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी उस्मानाबादमध्ये एक मोठी संवाद परिषद आयोजित करण्यात आल्याचंही गुणरत्न सदावर्ते यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
संतोष जाधव, उस्मानाबादः उस्मानाबादमध्ये (Osmanabad) आज स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीचा वाद चांगलाच पेटला आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या पुढाकारातून मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भ स्वतंत्र करण्याच्या मागणीसाठी संवाद परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. उस्मानाबादमध्ये मात्र स्वतंत्र मराठवाडा राज्याच्या संवाद परिषदेला मोठा विरोध होताना दिसत आहे.
संवाद परिषदेचे बॅनर अज्ञातांनी फाडले आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांचे फोटो असलेले बॅनर फाडले आहेत. उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह समोरील बॅनर फाडण्यात आले आहेत.
आज दुपारी 4 वाजता संवाद परिषद असून त्याला विरोध होत आहे. शिवसेना किंवा कोणीही विरोध केला तरी तो मोडून काढू रस्त्यावर उतरून लढा देऊ, प्रसंगी न्यायलयीन लढाई लढू असा इशारा रेवण भोसले यांनी दिला आहे..
जिल्हा परिषदेचा हॉल दिलाच कसा?
स्वतंत्र मराठवाडा संवाद परिषद कार्यक्रमदेखील वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कार्यक्रमासाठी उस्मानाबाद जिल्हा परिषद सभागृह दिलेच कसे हा प्रश्न समोर आला आहे. संवाद परिषद कार्यक्रमासाठी पोलीस परवानगी घेतली नाही.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यक्रम होणार आहे. जिल्हा परिषदेने 5 हजार घेऊन हॉल भाड्याने दिला आहे. परिषदच्या कार्यक्रमाला पोलीस बंदोबस्त देण्याची आयोजकानी लेखी मागणी केली आहे.
गुणरत्न सदावर्तेंचे फाडण्यात आलेले बॅनर्स आता घटनास्थळावरून बाजूला करण्यात आले आहेत. दुपारी 4 वाजता या संवाद परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीवरून आज दिवसभरात अनेक नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
नेमकी भूमिका काय?
मराठवाडा आणि विदर्भ ही स्वतंत्र राज्य झाली पाहिजेत. त्यांचा कारभार स्वतंत्र रितीने चालला पाहिजे. या भागातील मागसलेपणा संपवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून नवीन राज्य निर्मिती व्हावी, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. कष्टकऱ्यांचा आवाज सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी उस्मानाबादमध्ये एक मोठी संवाद परिषद आयोजित करण्यात आल्याचंही गुणरत्न सदावर्ते यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना सांगितलं.