उस्मानाबादः ठाकरे सरकारने (Thackeray Government) शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांच्या नामांतराचा प्रश्न निकाली लावला. औरंगाबादचं संभाजीनगर (Aurangabad Sambhajinagar) आणि उस्मानाबादचं धाराशिव (Osmanabad Dharashiv) असं नाव बदलण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. शिवसेनेच्या अनेक वर्षांपासूनच्या अजेंड्यावरचे हे प्रस्ताव मार्गी लागल्यामुळे एकीकडे शिवसेनेत आनंदाचं वातावरण आहे तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचं चित्र आहे. ठाकरे सरकारची शेवटची कॅबिनेट बैठक म्हणून महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी प्रत्यक्ष बैठकीच्या वेळी या निर्णयाला विरोध केला नाही तरीही स्थानिक नेत्यांमधील नाराजी अधिक तीव्रतेने बाहेर पडतेय. औरंगाबादेत काल या निर्णयाचा निषेध करत 200 काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले तर आज उस्मनाबादेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 40 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले.
उस्मानाबादेत शहराचं नाव धाराशिव केल्याचा वाद पेटला असून राष्ट्रवादीच्या 40 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. उस्मानाबादचे नाव धाराशिव केल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाराज असून त्यांनी याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यतक्ष जयंत पाटील यांना पत्र लिहून राजीनामे दिले. नामांतराला राष्ट्रवादीने मंत्री मंडळाच्या बैठकीत विरोध केला नाही. शरद पवार यांना आम्ही नेहमी साथ दिली. मात्र उस्मानाबादचे हे नामांतर मुस्लिम समाजाच्या जिव्हारी लागले आहे, अशी नाराजी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. अल्पसंख्यांक प्रदेश सचिव मसुद शेख, 5 नगरसेवक, जिल्हा उपाध्यक्ष, शहराध्यक्ष यांनी सामूहिक राजीनामे दिले. अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश सचिव मसुद शेख,इलीयास पिरजादे,शहराध्यक्ष आयाज शेख, नगरसेवक बाबा मुजावर, इस्माईल शेख, खलिफा कुरेशी,जिल्हा उपाध्यक्ष कादरखान पठाण, वाजीद पठाण, असद पठाण, बाबा फौजोद्दीन यासह पदाधिकारी यांनी राजीनामे दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सचिव मसूद शेख म्हणाले, ‘ 1905 मध्ये जिल्ह्याची निर्मिती झाली. धाराशिव हे एका राक्षसाचं नाव आहे. धारासूर मर्दिनी हे देवीचं मंदिर आहे. फक्त जातीय हेतूने नाव बदलण्याचा प्रयत्न आहे. धारासूर हे एक राक्षसाचं नाव असून त्यासाठी आमचा विरोध आहे. राष्ट्रवादी हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. या नामांतराच्या ठरावाला विरोध करावा, अशी मुस्लिम समाजातील सर्वांची इच्छा होती. राष्ट्रवादीवर पूर्ण विश्वास होता. पण त्याला तडा गेलाय. आमचा सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न होता. संस्कृतीचा अविभाज्य घटक होता. हिंदुंची संस्कृती आमच्यावर लादण्याचा प्रयत्न आहे. आज शहरातील लोकांनी राजीनामे दिले आहेत. उद्या जिल्ह्यातील लोक राजीनामा देतील. पक्षाने राजीनाम्याचा विचार केला नाही तर आम्हाला इतरही मार्ग आहेतच..असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिला आहे.
आम्ही उस्मानाबाद शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी गेल्या ३० ते ३५ वर्षापासुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये खंबीरपणे सक्रिय राहून समाजामध्ये पक्षाचे ध्येय धोरणाची अंबलबजावणी करत आहोत. उस्मानाबाद जिल्हा हा मुस्लिम बहुल जिल्हा असून जिल्ह्यातील समाज आदरणीय शरद पवार साहेब यांच्या तत्वांना नेहमीच साथ देत आलेला आहे परंतु उस्मानाबाद जिल्ह्याचा मुस्लिम समाजाचा जिव्हाळ्याचा व संस्कृतीचा विषय असून उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव उस्मानाबाद राहावे त्यात बदल होऊ नये अशी सर्व मुस्लिम समाजाची भावना असताना हा प्रश्न पक्षाच्या माध्यमातून सोडवावा असा प्रयत्न समाज व त्यातील कार्यकर्त्यांचा राहिलेला आहे परंतु राष्ट्रवादी पक्षावर समाजाचा नामांतरा विषयी पूर्ण भरोसा असताना कालच्या मंत्रिमंडळामध्ये ठराव होत असताना पक्षातील मंत्री गणांची सहमती ही आमच्या जिव्हारी लागली असून त्यामुळे आम्ही शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते राजीनामा देत आहोत तरी राजीनामा स्वीकार करावा..
औरंगाबादमध्येही एमआयएम आणि काँग्रेसने संभाजीनगर या नामांतराला कडाडून विरोध केला आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी आता औरंगाबादेत पाय तर ठेवून दाखवावा, असा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिलाय. तर काँग्रेसच्या शहराध्यक्षांसह 200 पदाधिकाऱ्यांनी धडाधड राजीनामे दिले.