उस्मानाबादेत राजकीय उलथापालथ, काँग्रेस-राष्ट्रवादी सेनापतीविना
पाटील परिवाराच्या (Padmasinha patil Ranajagjitsinha Patil) भाजप प्रवेशावरून शिवसेना आणि भाजप नेत्यात वाकयुद्ध रंगलंय. आमदार राणाजगजीतसिंह हे जय श्री रामचा नारा देत जुन्या कार्यकर्त्यांच्या संघटनात व्यस्त आहेत. आमदार राणांच्या प्रवेशातून भाजपने सरदार बदलण्याचे संकेत दिले आहेत.
उस्मानाबाद : गेल्या काही दिवसात झालेल्या अनपेक्षित राजकीय घडामोडींमुळे उस्मानाबाद (Osmanabad Politics) जिल्ह्याचा राजकीय नकाशाच बदललाय. एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला (Osmanabad Politics) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उस्मानाबादेत या पक्षांना पक्षांतराचे ग्रहण लागलंय. दोन्ही काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी पक्ष सोडल्याने हे पक्ष जिल्हाध्यक्षाविना (Osmanabad Politics) पोरके झाले आहेत. शिवसेना आणि भाजपात इनकमिंग वाढल्याने अच्छे दिन आले असले तरी युतीतील या पक्षात सत्ता संघर्ष वाढलाय. पाटील परिवाराच्या (Padmasinha patil Ranajagjitsinha Patil) भाजप प्रवेशावरून शिवसेना आणि भाजप नेत्यात वाकयुद्ध रंगलंय. आमदार राणाजगजीतसिंह हे जय श्री रामचा नारा देत जुन्या कार्यकर्त्यांच्या संघटनात व्यस्त आहेत. आमदार राणांच्या प्रवेशातून भाजपने सरदार बदलण्याचे संकेत दिले आहेत.
काँग्रेस राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाचे पक्षांतर
उस्मानाबाद जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील उस्मानाबाद आणि भूम हे मतदारसंघ राष्ट्रवादीचे, तर तुळजापूर मतदारसंघ काँग्रेसचा कायम बालेकिल्ला राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातेवाईक पद्मसिंह पाटील परिवाराची या जिल्ह्यातील राष्ट्रवादीवर एकहाती सत्ता होती. 40 वर्ष सत्ता भोगून अपेक्षित विकास न झाल्याचं कारण पुढे करत आणि भावी पालकमंत्रीपदाचं स्वप्न पडल्याने आमदार राणा पाटील यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला.
वाचा – पाटील कुटुंबाचा भाजप प्रवेश जिव्हारी, उस्मानाबादेत पवार स्वतः रणशिंग फुंकणार
आमदार राणा स्वतः पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांनी राष्ट्रवादी सोडल्याने पक्षाला जिल्हाध्यक्ष राहिलेला नाही. राष्ट्रवादीसारखीच स्तिथी काँग्रेस पक्षाची बनली असून जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे यांनी तीन तालुकाध्यक्षासह डजनभर काँग्रेस नेत्यांच्या हातात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. काँग्रेस नेतृत्वाने सत्तेपुरता वापर करून दुजाभाव केल्याचा आरोप चेडे यांनी केला. काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे हे जिल्ह्याचे सेनापतीच फुटल्याने अगोदरच गळतीमुळे संकटात आलेल्या पक्षाच्या गढी ढासळल्या आहेत .
पाटलांच्या भाजप प्रवेशाने शिवसेना – भाजपात ठिणगी
शिवसेनेचे उस्मानाबादचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे हत्याकांडानंतर राजे निंबाळकर आणि पाटील परिवारातील (Padmasinha patil Ranajagjitsinha Patil) पेटलेला संघर्षाचा वणवा अजूनही कायम आहे. उद्धव ठाकरे यांनी तर पाटील यांच्यावर मुसमुसलेला हत्ती आणि रेडा अशी टीका केली होती. पाटील परिवाराच्या भाजप प्रवेशानंतर त्यांचे कट्टर विरोधक शिवसेनेचे खासदार ओम राजे निंबाळकर यांनी रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत लढण्याची व मूठमाती देण्याची गर्जना केली.
वाचा – उस्मानाबादमध्ये काँग्रेसला खिंडार, जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडेंसह डझनभर नेते शिवसेनेत
शिवसेनेचे पालकमंत्री तानाजीराव सावंत यांनी शिवसेनेची सूत्रे ताब्यात घेतल्यानंतर खासदारकीच्या निवडणुकीसह राष्ट्रवादीची अनेक संस्थाने नियोजनबद्ध पद्धतीने काबीज केली. शिवसेनेचे प्रतिस्पर्धी असलेले आमदार राणा भाजपात गेल्याने त्यांनी भाजपला टार्गेट केलंय. डागाळलेली माणसे पक्षात घेऊन परिवर्तन होत नसते, उलट अधोगती होते, असे सांगत भाजपवर शिवसेनेचे मंत्री सावंत यांनी निशाणा साधला. तर आमची काळजी करू नका, आम्ही समर्थ आहोत, असं प्रतिउत्तर भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजानदेश यात्रेच्या सभेत दिलं. आमदार राणा यांच्यावरून आगामी काळात युतीतील मित्र पक्षात कलगीतुरा चांगलाच रंगणार आहे.
भाजपने सरदार बदलला?
भाजप-शिवसेनेच्या कलगीतुऱ्यावर आमदार राणा मात्र स्वभावाप्रमाणे शांत आहेत. जय श्रीरामचा नारा देत जुन्या कार्यकर्त्यांची जमवाजमव करण्यात ते व्यस्त आहेत. शिवसेनेचे जिल्ह्यात (Osmanabad Politics) प्राबल्य वाढत असल्याने त्याला शह देण्याच्या रणनीतीतून आमदार राणा यांना भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने पक्षात घेतलंय. पाटील परिवाराची यंत्रणा आणि संघटन कौशल्य वापरून उस्मानाबाद भाजपचा बालेकिल्ला बनविण्याचे प्रयत्न आहेत.
स्थानिक भाजपा नेत्यांनी पक्ष वाढवला असला तरी मतदानाची कमान मात्र मोदी नावावर कायम आहे. राष्ट्रवादीत मालक बनून राहण्याची सवय असलेले राणा (Padmasinha patil Ranajagjitsinha Patil) भाजपाचा किल्ला पण लवकरच डावपेचाने काबिज करतील असा विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे. पाटील यांनी त्यांचे संस्थान भाजपात विलीन केल्याचा फायदा भाजपाला कितपत होतो हे पाहावे लागेल. राणांच्या माध्यमातून भाजपने सरदार बदलल्याची चर्चा रंगत आहे.
निष्ठावान कार्यकर्ते संभ्रमात, मतदार आश्चर्यचकीत
ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना दशको विरोध (Osmanabad Politics) केला तेच नेते आता शिवसेन- भाजपात आल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. सर्वच राजकीय पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि मतदारही संभ्रमात आहेत. निष्ठावानांना न्याय मिळणार कधी हा प्रश्न कालबाह्य ठरतोय. एकमेकांवर कुरघोडी केलेले कार्यकर्ते आता नाईलाजाने का होईना गळ्यात गळे घालून जय महाराष्ट्र आणि जय श्रीरामची माळ जपत आहेत. अनेक वर्ष सत्ता भोगलेली मंडळी विकासासाठी पक्ष सोडल्याचे सांगत असल्याने मतदार राजाही आश्चर्यचकीत झालाय.