Congress vs Shivsena : तुझं माझं जमेना! शिवसेना आम्हाला न्याय देत नाही, आम्ही कोर्टात जाणार, भाई जगताप भडकले, आघाडीत पुन्हा धुसफूस
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमध्ये नेहमी कुरबूरी सुरू असल्याचं वारंवार दिसून येतं.
पनवेल : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमध्ये नेहमी कुरबूरी सुरू असल्याचं वारंवार दिसून येतं. शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी आणि काँग्रेस (Congress) या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये या न त्या कारणावरुन आरोप-प्रत्यारोपही बघायला मिळतात. अलिकडेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले होते. राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसल्याचं पटोलेंनी बोलून दाखवलं होतं. हा मुद्दा सरत नाही तर पुन्हा आघाडीत मुख्यमंत्री पदावरुन कुरबूर सुरू झाली. एकीकडे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवाला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दे, असं साकडं घातलं होतं. तर दुसरीकडे पुढचे 25 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहतील असं विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं. आघाडीच्या या वादात आता आणखी एक ठिणगी पडली आहे. काँग्रेसचे नेते भाई जगताप (bhai jagtap) यांनी शिवसेना योग्य न्याय देत नसल्याचा आरोप केलाय. यावेळी त्यांनी कोर्टात जाण्याचीही भाषा केली आहे. यामुळे महाविकास आघाडीतील वातावरण चांगलंच तापल्याचं दिसतंय.
पनवेलमध्ये मुंबई काँग्रेसकडून 2 दिवसीय संकल्प शिबिराच आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिराच दीपप्रज्वलन करण्यात आलं. यावेळी पालकमंत्री अस्लम शेख, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, एच. के. पाटील, काँग्रेस नेते भाई जगताप यांची उपस्थिती होती. भाई जगताप यावेळी शिवसेनेवर भडकल्याचं दिसून आलं. त्यांनी शिवसेनेवर आपली नाराजी व्यक्त केली. यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीत कुरबुरी सुरु असल्याचं उघड झालंय. मुंबई महापालिकेवरुन या वादावादी सुरू आहेत. शिवसेना अन्याय करत असल्याचं यापूर्वी देखील महाविकास आघाडीतील नेत्यांनी बोलून दाखवलं होतं. पुन्हा एकदा काँग्रेस महाविकास आघाडीवर नाराज असल्याचं दिसतंय.
भाई जगताप नेमकं काय म्हणाले?
काँग्रेस नेते भाई जगताप यावेळी म्हणाले की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्यावर मुंबई महानगर पालिकेच्या संदर्भात 2 ते 3 बैठका झाल्या आहेत. आपल्या कोणत्याच मागण्या शिवसेना पूर्ण करत नाही आहेत. त्यामुळे आम्ही शिवसेनेवर नाराज आहोत. मुंबई महापालिकेत फक्त 23 जागांची आरक्षण सोडत झाली आहे. त्यामधील काँग्रेसच्या 21 नगरसेवकांच्या आरक्षण बदली झाले आहेत. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल हे शिवसेनेच्या दाबावाखाली काम करत आहेत, असा आरोपही भाई जगताप यांनी यावेळी केला आहे. पुढे ते म्हणाले की, ‘शिवसेना आम्हाला योग्य न्याय देत नाही . आत्तापर्यंत फक्त चर्चा झाली पण त्यात कोणताही मार्ग हा सुटलेला नाही आहे. ज्या वॉर्डमध्ये मागासवर्गीय लोकांची संख्या कमी आहे. त्या वॉर्डचं आरक्षण SCमध्ये झालं आहे आणि अशी बरीच उदाहरण या आरक्षण सोडतीमध्ये बघायला मिळाली आहे. जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही कोर्टात यासंदर्भात दाद मागणार, असं देखील भाई जगताप यावेळी म्हणालेत.