राहुल गांधींचं कथित वक्तव्य, जे पाकिस्तानने UN मध्ये ‘शस्त्र’ म्हणून वापरलं
यूएनला पाकिस्तानच्या मानवाधिकार मंत्री शिरीन मजारी यांनी पत्र लिहिलंय, ज्यात दावा करण्यात आलाय की, कलम 370 हटवल्यानंतर राहुल गांधींनी जम्मू काश्मीरमध्ये लोकांचा मृत्यू झाल्याबाबतचा उल्लेख केला होता. पाकिस्तानमध्ये राहुल गांधींचं हे वक्तव्य स्थानिक माध्यमांसह अनेक नेत्यांनीही वापरलं आहे.
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi’s statement) यांच्या एका कथित वक्तव्यावरुन नवा वाद सुरु झालाय. पाकिस्तानने राहुल गांधींचं वक्तव्य (Rahul Gandhi’s statement) संयुक्त राष्ट्रामध्ये (UN) शस्त्र म्हणून वापरलं. यूएनला पाकिस्तानच्या मानवाधिकार मंत्री शिरीन मजारी यांनी पत्र लिहिलंय, ज्यात दावा करण्यात आलाय की, कलम 370 हटवल्यानंतर राहुल गांधींनी जम्मू काश्मीरमध्ये लोकांचा मृत्यू झाल्याबाबतचा उल्लेख केला होता. पाकिस्तानमध्ये राहुल गांधींचं हे वक्तव्य स्थानिक माध्यमांसह अनेक नेत्यांनीही वापरलं आहे.
राहुल गांधी यांनी रविवारी एक ट्वीट केलं होतं. जम्मू काश्मीरमध्ये लोकांचं स्वातंत्र्य आणि त्यांची मोकळीक यावर बंधनं घालून 20 दिवस उलटले आहेत. माध्यमे आणि विरोधकांनी काश्मीरला जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना जम्मू काश्मीरमध्ये वापरल्या जात असलेल्या कठोर बळाची जाणिव झाली, असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं. पाकिस्तानचं प्रमुख वृत्तपत्र डॉननेही हे वक्तव्य शस्त्र म्हणून वापरलं, शिवाय पाकिस्तानच्या नेत्यांनीही राहुल गांधींचं वक्तव्य आपापल्या पद्धतीने वापरलं.
दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये लोकांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख राहुल गांधींनी कुठेही केला नव्हता. पण पाकिस्तानच्या मानवाधिकार मंत्र्यांनी याबाबत दावा केला. “भारतीय राजकारणातील प्रमुख राजकारणी, जसं की राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीरमध्ये लोक मरत असल्याचं मान्य केलं,” असं शिरीन मजारी म्हणाल्या. मजारी यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या वक्तव्याचाही उल्लेख केला. काश्मिरी मुलींसोबत लग्नाबाबतचं हे वक्तव्य होतं. राहुल गांधींबाबतचं वक्तव्य काँग्रेसने फेटाळलं आहे.
भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झुकतं माप दिलं जात असल्याचा आरोपही शिरीन मजारी यांनी ट्विटरवर केला होता. काश्मीर प्रकरणी खोट्या बातम्या आणि व्हिडीओ प्रसिद्ध करणारे 200 अकाऊंट ट्विटरने सस्पेंड केले होते. याबाबतची नोटीस सोशल मीडियावर प्रसिद्ध करत मजारी यांनी ट्विटरवरच पक्षपातीपणाचा आरोप केला.