पालघरमध्ये श्रीनिवास वनगांना भाजपच्या तिकिटावर लढवण्याच्या हालचाली?
पालघर : शिवसेना आणि भाजप यांच्या युतीमध्ये पालघरची जागा शिवसेनेला सोडण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजप यांचा संघर्ष टोकाला पोहोचला होता. भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा याचे पुत्र श्रीनिवास वनगाच शिवसेनेचे पालघर लोकसभेचे उमेदवार असल्याचे संकेत मिळत असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तर भाजप महाराष्ट्र प्रदेश आदिवासी आघाडी प्रसिद्ध प्रमुख […]
पालघर : शिवसेना आणि भाजप यांच्या युतीमध्ये पालघरची जागा शिवसेनेला सोडण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजप यांचा संघर्ष टोकाला पोहोचला होता. भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा याचे पुत्र श्रीनिवास वनगाच शिवसेनेचे पालघर लोकसभेचे उमेदवार असल्याचे संकेत मिळत असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तर भाजप महाराष्ट्र प्रदेश आदिवासी आघाडी प्रसिद्ध प्रमुख लुईस काकड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पत्राद्वारे पालघर लोकसभेसाठी पुनर्विचार होऊन कमळ चिन्ह असलेला कुठलाही उमेदवार नसल्यास कार्यकर्त्यांचा आग्रहाने अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे कळविले आहे. पोटनिवडणुकीत शिवसेनेने केलेल्या जखमा अजून भाजप कार्यकर्ते विसरलेले नसल्याने युतीमधील दुफळी स्पष्ट दिसू लागली आहे.
महाआघाडीकडून बविआला पालघरची जागा
सध्या पालघर नगरपरिषदेच्या निवडणुका असल्याने शिवसेनेने पालघर लोकसभेसाठी उमेदवाराची घोषणा वगळता उर्वरित 21 जागेच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. पालघर लोकसभेची जागा महाआघाडीने बहुजन विकास आघाडीला सोडल्याचं शनिवारी घोषित करण्यापूर्वीच सीपीएम पक्षाने बहुजन विकास आघाडीसोबत असल्याचं जाहीर केलं. यापुढील निवडणुका एकत्र लढणार असल्याचं जाहीर केल्याने युतीच्या गोटात चिंता निर्माण झाली आहे. बविआच्या उमेदवाराला सीपीएम पक्षासोबत महाआघाडीचेही मतं मिळणार असल्याने बहुजन विकास आघाडीचे पारडे जड वाटू लागले आहे. मात्र शिवसेनेप्रमाणे बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी उमेदवारांचे नाव अद्यापही गुलदस्त्यात ठेवले आहे.
श्रीनिवास वनगांची घरवापसी?
युतीतील कार्यकर्त्यांमधील नाराजी पाहता आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन न झाल्यास, याचा फटका युतीला बसू शकतो. भाजपचे दिवंगत खासदार वनगा यांच्या पुत्राची पुन्हा घरवापसी करण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवर होतोय की काय असा कयास राजकीय तज्ज्ञांनी बांधला आहे. शिवसेनेत गेलेले श्रीनिवास वनगा यांची भाजपमध्ये घरवापसी झाली, तर युतीमध्ये राजकीय भूकंप होऊ शकतो. उमेदवार श्रीनिवास वनगा यांनाच ठेवून कमळ चिन्हावर निवडणूक झाल्यास कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर होऊ शकते. मात्र वनगा यांच्या मृत्यूनंतर भाजप जिल्हाध्यक्षपासून पदाधिकाऱ्यांनी दिलेली वागणूक वनगा कुटुंब विसरतील का हाही मोठा प्रश्न आहे. वनगा कुटुंबाची घरवापसी अशक्यच असल्याचं चित्र आहे. येत्या दोन दिवसात पालघर लोकसभेसाठी युतीचा उमेदवार कोण असेल हे ठरणार असलं तरी शिवसेनाही एकेक पाऊल रणनीती आखून उचलत आहे.
राजेंद्र गावितांची भूमिका काय?
लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपने ऐनवेळी काँग्रेसचे राजमंत्री राहिलेले राजेंद्र गावित यांना उमेदवारी देऊन निवडून आणलं होतं. परंतु युतीच्या जागावाटपात पालघरची जागा शिवसेनेला सोडल्याने खासदार राजेंद्र गावित पुढे काय पाऊल उचलतात हे पाहणं औत्सुकतेचे असणार आहे. राजेंद्र गावितांना बहुजन विकास आघाडीकडूनही ऑफर असल्याचं सांगण्यात येत असलं तरी गावित बहुजन विकासमध्ये सामील होतील का हे काही दिवसानंतरच कळू शकेल. दुसरीकडे शिवसेनाही वनगा कुटुंबतीलच अन्य व्यक्तीला उमेदवारी देण्याची चाचपणी करतेय का हे उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच समोर येऊ शकेल.