मुंबई: देशातील प्रत्येक निवडणूक लढवणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे असे मानणाऱ्या अभिजित बिचुकले (Abhijit Bichukale) यांनी आता पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Pandharpur Bypoll) रिंगणात उडी घेतली आहे. अभिजित बिचुकले यांचा सामाजिक, राजकीय, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील वावर कायम चर्चेचा विषय असतो. आतापर्यंत बिचुकले यांनी लोकसभा, विधानसभा अगदी राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक लढवून झाली आहे. मात्र, आतापर्यंत कोणत्याची निवडणुकीत त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडलेली नाही. तरीदेखील अभिजित बिचुकले हे चिकाटीने मोठमोठ्या निवडणुका लढवत असतात. (Abhijit Bichukale will contest in Pandharpur bypoll)
आतादेखील बिचुकले यांच्या उमेदवारीमुळे पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारात रंगत येणार आहे. ते लवकरच आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. विठुरायाच्या नगरीची झालेली दुर्दशा बघवत नाही. राज्यातील उद्दाम प्रशासकीय अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी मी ही निवडणूक लढवत असल्याचे बिचुकले यांनी सांगितले.
काही महिन्यांपूर्वीच पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूकही बिचुकले यांनी लढवली होती. मात्र, त्यावेळी मतदानाला गेलेल्या बिचुकले यांचे नावच मतदार यादीत सापडले नव्हते. त्यामुळे अभिजित बिचुकले यांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते. त्यापूर्वी 2019 मध्ये अभिजित बिचुकले यांनी वरळी मतदारसंघातून थेट शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांच्याविरोधात शड्डू ठोकला होता.
राष्ट्रवादीचे माजी आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर होणारी पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. सांगली आणि जळगाव महानगरापालिकेत ओढावलेल्या नामुष्कीनंतर भाजपने आता पंढरपुरात संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावायची ठरवली आहे. त्यासाठी भाजपकडून समाधाना आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तर राष्ट्रवादीने भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही उमेदवारांचे अर्ज आज दाखल करण्यात आले. यानिमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हानही दिले आहे.
17 एप्रिलला मतदान, 2 मे रोजी गुलाल!
अर्ज भरण्यास सुरुवात – 23 मार्च 2021
>> अर्ज भरण्याची अंतिम तारीख – 30 मार्च 2021
>> अर्जांची छाननी – 31 मार्च 2021
>> अर्ज मागे घेण्याची तारीख – 3 एप्रिल 2021
>> मतदान – 17 एप्रिल 2021
>> निवडणूक निकाल – 2 मे 2021
संबंधित बातम्या
जयंत पाटलांच्या वक्तव्याने पंढरपूर पोटनिवडणुकीत ट्विस्ट, फडणवीस उमेदवार मागे घेणार?
बारामतीत डिपॉझिट जप्त, तरीही मी आमदार झालो, समाधान आवताडेही होईल : गोपीचंद पडळकर
पवारसाहेब काळजी करु नका, पंढरपूरचा कार्यक्रम आमचा आम्ही करतो : जयंत पाटील
(Abhijit Bichukale will contest in Pandharpur bypoll)