पंढरपूर : “सोलापूर जिल्हा शिवसेना महिला आघाडी संघटक म्हणून मोठी जबाबदारी पक्षाने मला दिली होती. शिवसेना मी घराघरात पोहचवली. पक्षाने केलेली कारवाई मला मान्य आहे” अशी प्रतिक्रिया शैला गोडसे (Shaila Godse) यांनी दिली आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत (Pandharpur Mangalvedha By Poll) राष्ट्रवादीतर्फे रिंगणात उतरलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी केल्याने गोडसे यांनी शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. (Pandharpur Bypoll Shivsena rebel Shaila Godse reacts after expulsion)
“जनतेच्या आग्रहास्तव अर्ज भरला”
“पक्षाने केलेली कारवाई मला मान्य आहे. ही कारवाई मला अपेक्षितच होती. मात्र जनतेचा आग्रह असल्याने मी उमेदवारी अर्ज भरला. पक्ष अडचणीत येऊ नये, म्हणून माझी सुद्धा राजीनामा देण्याची तयारी होती. मी पक्षातील कोणावरही नाराज नाही. पक्षाने मला भरभरुन दिले आहे. जनेतेचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाने मला मदत केली आहे. सोलापूर जिल्हा शिवसेना महिला आघाडी संघटक म्हणून मोठी जबाबदारी पक्षाने मला दिली होती. शिवसेना मी घराघरात पोहोचवली” अशी प्रतिक्रिया शैला गोडसे यांनी दिली.
शिवसेनेकडून हकालपट्टी
शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटक राहिलेल्या शैला गोडसे यांनी पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भारत भालके यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता होती. त्यामुळे शिवसेनेने शैला गोडसे यांना सरळ बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
राष्ट्रवादीचे माजी आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मंगळवेढ्याची जागा रिक्त झाली होती. त्यानंतर होणारी पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. सांगली आणि जळगाव महानगरपालिकेत ओढवलेल्या नामुष्कीनंतर भाजपने आता पंढरपुरात संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावायची ठरवली आहे.
भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने
भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीने भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांना तिकीट दिलं आहे. दोन्ही उमेदवारांचे अर्ज काल दाखल करण्यात आले. यानिमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हानही दिले आहे.
पंढरपुरात एकूण तब्बल 39 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अशा स्थितीत भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना बंडाचा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या उमेदवारीला घरातूनच विरोध होत असल्याचं पाहायला मिळतंय. समाधान आवताडे यांचे चुलत भाऊ सिद्धेश्वर आवताडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय भाजप पुरस्कृत नगराध्यक्षाच्या पतीने दंड थोपटले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी यांनीही मैदानात उडी घेतल्याने निवडणूक बहुरंगी झाली आहे. (Pandharpur Bypoll Shivsena rebel Shaila Godse reacts after expulsion)
जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला
महाविकास आघाडीच्या सर्व घटकांचा भगीरथांना आशीर्वाद आहे. जेव्हापासून महाविकास आघाडी आली आहे, भाजपचा कुठेही विजय झालेला नाही. सगळे एकत्र आल्यावर भाजपचा पराभव होतो ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणूनच काहींनी भाजपची उमेदवारी घेतली नाही. फडणवीसांनी उमेदवार देणार नाही असं सांगितलं होतं. आपण तीन तारखेपर्यंत वाट पाहू. फडणवीसांवर आताच अविश्वास दाखवणं योग्य होणार नाही, असं जयंत पाटील यांनी सांगितले होतं. त्यामुळे भाजप उमेदवारी मागे घेणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या
बारामतीत डिपॉझिट जप्त, तरीही मी आमदार झालो, समाधान आवताडेही होईल : गोपीचंद पडळकर
पवारसाहेब काळजी करु नका, पंढरपूरचा कार्यक्रम आमचा आम्ही करतो : जयंत पाटील
पंढरपुरात राष्ट्रवादीविरोधात बंडखोरी, शिवसेनेकडून जिल्हा संघटकाचीच हकालपट्टी
(Pandharpur Bypoll Shivsena rebel Shaila Godse reacts after expulsion)