देवेंद्र फडणवीसांशी भांडण, पण मी भाजपसोबतच- महादेव जानकर
भाजपवर आपण नाराज असलो तरी कुठेही जाणार नाही. आपण सध्या NDAमध्येच आहोत आणि पुढेही NDAमध्येच राहणार असल्याचं जानकर यांनी सांगितलं.
बारामती: महाराष्ट्रातील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. माझं आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं भांडण आहे. पण मी त्याचा फायदा दुसऱ्याला होऊ देणार नाही. त्यामुळे मी भाजपसोबतच राहणार असल्याचं जानकर यांनी स्पष्ट केलं आहे. जानकर आज बारामतीत एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Mahadev jankar on Devendra Fadnavis and Gopichand Padalkar)
महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. पण गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या कारखान्याच्या कामासंदर्भात ही भेट होती, असं जानकरांनी स्पष्ट केलं आहे. भाजपवर आपण नाराज असलो तरी कुठेही जाणार नाही. आपण सध्या NDAमध्येच आहोत आणि पुढेही NDAमध्येच राहणार असल्याचं जानकर यांनी सांगितलं. एखाद्या पक्षाचा पडता काळ असल्यावर आपण पळून जायचं नसतं, असंही जानकर म्हणाले.
धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी आपल्यापरीने प्रयत्न सुरुच असल्याचं जानकरांनी सांगितलं. माझं आणि देवेंद्र फडणवीसांचं भांडण सुरु आहे. पण त्याचा फायदा आम्ही दुसऱ्याला होऊ देणार नाही. त्यामुळे आपण NDAमध्येच राहणार असल्याचं जानकर म्हणाले.
आमदार गोपीचंद पडळकरांना टोला
धनगर समाजाचे नेते अशी ओळख असलेल्या जानकरांना डावलून फडणवीसांनी गोपीचंद पडळकर यांना जवळ केल्यानं जानकर नाराज आहेत. पण माझा जिल्हाध्यक्ष जेवढा प्रबळ आहे, तेवढा तो नाही, अशा शब्दात जानकरांनी आमदार गोपीचंद पडळकर यांनाही टोला हाणला.
जानकर-पवार भेटीनं चर्चेला उधाण
राष्ट्रीय समाज पार्टीचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेस उधाण आलं आहे. ही भेट साखर कारखान्याच्या प्रश्नाशी संबंधित असल्याचं जानकर सांगत असले तरी जानकर हे लवकरच महाआघाडीत सामिल होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
महादेव जानकर यांनी 3 तारखेला मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेतली होती. या तिन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास खलबतं झाल्याचं सांगण्यात येतं. जानकर यांनी ही राजकीय भेट नसल्याचं जाहीर केलं आहे. रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या साखर कारखान्याच्या कामानिमित्ताने पवारांची भेट घेण्यात आल्याची सारवासारव जानकर यांनी केली आहे. तसेच पवारांची भेट घेण्याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा करून त्यांना या भेटीची कल्पना दिली होती, असा दावाही जानकर यांनी केला आहे.
2014मध्ये जानकरांचं बारामतीत तगडं आव्हान
2014च्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी बारामतीतून राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी प्रचंड मते घेऊन राष्ट्रवादीला धक्का दिला होता. खडकवासल्यात जानकरांना चांगली मते मिळाली होती. तर इंदापूर आणि भोरमध्ये सुप्रिया सुळे यांना जेमतेम मते मिळाली होती. बारामतीत सुप्रिया यांना एक लाख ४२ हजार ६२८ मते, तर जानकर यांना अवघी ५२ हजार मते मिळू शकली. बारामतीने त्यावेळी सुप्रिया यांना साथ दिली नसती तर निकालाचे चित्रं काही वेगळं दिसलं असतं असं बोललं जातं. या निवडणुकीमुळे जानकर चांगलेच चर्चेत आले होते.
संबंधित बातम्या:
महायुतीतून आणखी एक पक्षबाहेर पडणार?, जानकरांनी घेतली पवारांची भेट
Mahadev jankar on Devendra Fadnavis and Gopichand Padalkar