विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अध्यक्षपद काँग्रेसकडे, वारकरी संप्रदाय म्हणतो राजकीय नेता नको
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला राजकीय स्वरुप देऊ नये, अशी मागणी विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष तुकाराम महाराज भोसले यांनी सरकारकडे केली आहे. भाजप सरकारच्या काळात या ठिकाणच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे राजकीय व्यक्तींचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीनेही या अध्यक्षपदाकडे पाहिले जाते.
पंढरपूर : पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अध्यक्ष पदावर वारकरी संप्रदायातील व्यक्ती नेमण्याची मागणी केली जात आहे. पंढरपूरमध्ये विश्व वारकरी सेनेच्या बैठकीत यासंबंधी निर्णय झाला. राजकीय व्यक्ती अध्यक्षपदी नेमण्यास वारकऱ्यांनी विरोध दर्शवला. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्षपद काँग्रेसकडे गेल्यानंतर कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता वाढली आहे. (Pandharpur Shri Vitthal Rukmini Temple Committee Chairman Varkari Opposes Political leadership)
वारकऱ्यांची मागणी काय?
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला राजकीय स्वरुप देऊ नये, अशी विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष तुकाराम महाराज भोसले यांची सरकारकडे मागणी आहे. राजकीय व्यक्ती, आमदार, खासदार यांना मंदिर समितीवर अध्यक्ष नेमल्यास विश्व वारकरी सेना राज्यभर तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला.
फडणवीस काळात राज्यमंत्रिपदाचा दर्जा
पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे मोठे तीर्थक्षेत्र आहे. वर्षभरातील प्रमुख वाऱ्या या ठिकाणी बहरतात. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला महत्त्व आहे. भाजप सरकारच्या काळात या ठिकाणच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे राजकीय व्यक्तींचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीनेही या अध्यक्षपदाकडे पाहिले जाते.
सध्याची मंदिर समिती भाजप काळात अस्तित्वात आली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन अध्यक्ष अतुल भोसले यांनी राजीनामा दिला. तेव्हापासून सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडे सर्व पदभार आहे.
गहिनीनाथ महाराज औसेकरांचे नाव चर्चेत
महाविकास आघाडी सरकारने नव्या नियुक्त्या करणार हे घोषित केल्यानंतर पंढरपूर देवस्थान काँग्रेसकडे गेले आहे. त्यामुळे इथे कोणाची निवड होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण विद्यमान सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे नाव आघाडीवर आहे. ते मूळचे लातूर जिल्ह्यातील औसा येथील आहेत. माघ वारीला त्यांची शेकडो वर्षांची परंपरा आहे. वारकरी संप्रदायतील असल्याने सध्या त्यांचं नाव आघाडीवर आहे.
राजकीय क्षेत्रातून कोणाची नावं आघाडीवर?
दुसरीकडे, राजकीय क्षेत्रातून आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांची नावे चर्चेत आहेत. पण वारकरी संप्रदायाशी निगडित हे देवस्थान असल्याने या ठिकाणी राजकीय पार्श्वभूमीऐवजी वारकरी संप्रदायाशी निगडित व्यक्तींना संधी देण्याची गरज व्यक्त होत आहे.
महाविकास आघाडी सरकार, विशेषतः काँग्रेस आता वारकरी संप्रदायाचा विरोध डावलून राजकीय नेत्यालाच संधी देते, की वारकऱ्यांचे प्रश्न समजणाऱ्या व्यक्तीला, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ, अध्यक्षपदी राष्ट्रवादीचा युवा आमदार, शिवसेनेकडे उपाध्यक्षपद
(Pandharpur Shri Vitthal Rukmini Temple Committee Chairman Varkari Opposes Political leadership)