मुंबई : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार तथा बंधू धनंजय मुंडे(dhananjay munde) यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांचा राजकीय प्रवास खडतर झाला आहे. तेव्हापासून आतापर्यंत पंकजा मुंडे यांचं राज्यात पुनर्वसन झालेलं नाही. पक्षाकडून अद्याप त्यांच्यावर कोणतीही मोठी जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही. पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्या पदरी निराशा आली आहे.
भाजप कडून जाहीर करण्यात आलेल्या विशेष नियुक्तांमध्ये पंकजा यांना सहप्रभारी पद देण्यात आले आहे. तर दुसरीकडे विनोद तावडे आणि प्रकाश जावडेकर यांच्यावर प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी एक यादी जाहीर केली. आगामी निवडणुकांच्या तोंडावर विविध राज्यांमध्ये प्रभारी आणि सहप्रभारीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याची ही यादी आहे. विनोद तावडे बिहारचे तर प्रकाश जावडेकर यांची केरळचे भाजप प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंकजा मुंडे मध्यप्रदेश, विजया रहाटकर राजस्थानच्या सहप्रभारी म्हणून काम पाहणार आहेत.
या यादीमुळे पंकजा मुंडे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. पंकजा मुंडेंना भाजपने मध्य प्रदेशच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, त्यांना फक्त सहप्रभारी म्हणून नेमण्यात आले आहे. या नियुक्तीमुळे पंकजा यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडेंवर भाजप पक्षाकडून कोणतीही मोठी जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही. राज्यसभेच्या निवडणुकांच्या वेळी पंकजा यांचे नाव चर्चेत आले होते. मात्र भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत पंकजा यांचे नाव नव्हते. यानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी मिळू शकते अशी चर्चा रंगली होती. मात्र, येथेही त्यांची घोर निराशा झाली. भाजपने पंकजा मुंडे यांना डावलून विधान परिषदेवर प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय यांना संधी दिली. आता पुन्हा एकदा त्यांच्यावर सहप्रभारी पद सोपवुन त्यांना डावलले आहे.