‘तुमच्या निष्काळजीपणामुळेच जिल्ह्याची बदनामी’, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर पलटवार
'माझ्या पाच वर्षाच्या काळात जिल्ह्याला मान खाली घालावी लागेल असं काम केलं नाही. चांगले अधिकारी आणले. माझ्यावर ऑपरेशन झालं तेव्हा माझ्यावर आरोप करण्यात आले. मी बीड जिल्ह्याची काळजी करते. तुमच्या निष्काळजीपणामुळे जिल्ह्याची बदनामी झाली', अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेवर निशाणा साधलाय.
बीड : माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) या राजकारणातील भावा-बहिणीमध्ये सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. बीड जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात (Girls birth rate) मोठी घट झाल्याची बातमी आली होती. त्यावरुन पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याची बदनामी करत असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. ‘जिल्ह्याची बदनामी सुरु आहे. त्याला एखादा जिल्हा शल्य चिकित्सक जबाबदार असेल, जिल्हाधिकारी जबाबदार असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी जबाबदार असतील, पीएससीचे सगळे डॉक्टर जबाबदार असतील त्यांना जबाबदार धरायचं. काहीही झालं की बीड जिल्ह्याची बदनामी करण्याचं काम सुरु आहे’, असं धनंजय मुंडे म्हणाले होते. त्यावर आता पंकजा मुंडे यांनी पलटवार केलाय. ‘बीड जिल्ह्याची मी काळजी करते, तुमच्या निष्काळजीपणामुळेच जिल्ह्याची बदनामी होतेय’, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केलीय.
बीड जिल्ह्यातील लिंबागणेशमधील विकासकामांचं उद्घाटन आज पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना पंकजा मुंडेंनी जिल्ह्याच्या विकासावरुन धनंजय मुंडेंवर हल्ला चढवला. पंकजा मुंडे म्हणाल्या की, 8 मार्चला माझ्या गळ्याचं ऑपरेशन झालं. डॉक्टरांनी मला आराम करण्याचा सल्ला दिला होता. माझी वाणी बंद झाली म्हणून मला करमत नव्हते. ऑपरेशन नंतर माझे हे पहिलेच भाषण आहे. मी शेकडो कोटींचा विकास केला. मी केलेल्या कामांचं क्रेडिट घेत नाही. बीडमध्ये उत्तम रोजगार निर्मिती व्हावी अशी माझी इच्छा होती. बीड मध्ये रेल्वे आणली. जर घर आवरतो तसं मी माझा जिल्हा सावरला. मी तुमची कर्जदार आहे. गुंडागर्दीचं राजकारण केलं असतं तर मुंडे साहेबांना शोभलं असतं का? एक तरुण नेता निर्माण करणारी फॅक्ट्री मुंडेसाहेबांनी तयार केली. माझ्यासोबत काम करणारा कार्यकर्ता मंत्री, आमदार, खासदार झाला पाहिजे, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात केलं.
पंकजांचा धनुभाऊंवर हल्लाबोल
‘माझ्या पाच वर्षाच्या काळात जिल्ह्याला मान खाली घालावी लागेल असं काम केलं नाही. चांगले अधिकारी आणले. माझ्यावर ऑपरेशन झालं तेव्हा माझ्यावर आरोप करण्यात आले. मी बीड जिल्ह्याची काळजी करते. तुमच्या निष्काळजीपणामुळे जिल्ह्याची बदनामी झाली’, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेवर निशाणा साधलाय.
‘राजकारण वेगळ्या स्तराला पोहोचलं’
एक स्त्री म्हणून काम करत असताना माझ्या जिल्ह्यातील स्त्रीयांकडे डोळो उघडण्याची हिम्मत कुणाची नव्हती. मी सोलून काढत होते. मी कधी सूडबुद्धीने वागले नाही. विरोधकांचाही द्वेष केला नाही. राजकारण करत असताना सरकारमध्ये पाच वर्षे होते या काळात लोकांचे प्रश्न सोडवले. आज टीव्ही लावल्यानंतर फक्त आरोप-प्रत्यारोप सुरु अशतात. एक प्रकारची सर्कस सुरु आहे. राजकारण वेगळ्या स्तराला गेलंय, अशी खंतही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलीय.
‘माझे कार्यकर्ते दारु पिणारे, तंबाखू खाणारे नाहीत’
पंकजा पुढे म्हणाल्या की, बाबा घरी असताना डॉक्टर बूट घालून घरी आला. शेतकरीही चिखलाने भरुन आला. साहेब पाठीमागे होते. मी शेतकऱ्याला त्याच चिखलाने माखलेल्या अवस्थेत घरात घेतलं. एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला वेगळ्या न्याय असं मी केलं नाही. माझे कार्यकर्ते दारु पिणारे, तंबाखू खाणारे नाहीत. माझ्या बीड जिल्ह्याचं नाव चांगल्या गोष्टींसाठी घेतलं गेलं पाहिजे. माझं नाव कोणत्याही कोनशीलेवर नको, ते तुमच्या हृदयात आहे आणि तिथेच ठेवा. तुम्ही सांगाल ते मी करेन आणि करणार. देशातून जास्त खासदार आमचे आहेत, निधी कमी पडू देणार नाही, असा दावाही पंकजा मुंडे यांनी केलाय.
इतर बातम्या :