जानकर म्हणाले, बहीणही जबाबदारी घ्यायला तयार नाही, पंकजा म्हणतात…
मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय. लोकसभेच्या जागावाटपासाठी महादेव जानकरांनी भाजपला एक दिवसाचा अल्टीमेटम दिलाय. शिवाय पंकजांवर त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. बहीण-बहीण म्हणून जवळ गेलो, पण बहिणीनेही जबाबदारी घेतली नाही, असं ते म्हणाले. मुंबईत पंकजा मुंडे यांनाही […]
मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय. लोकसभेच्या जागावाटपासाठी महादेव जानकरांनी भाजपला एक दिवसाचा अल्टीमेटम दिलाय. शिवाय पंकजांवर त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. बहीण-बहीण म्हणून जवळ गेलो, पण बहिणीनेही जबाबदारी घेतली नाही, असं ते म्हणाले.
मुंबईत पंकजा मुंडे यांनाही जानकरांच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला. पण ते काय बोलले हे मला माहित नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणार नाही, असं पंकजा म्हणाल्या. पंकजा आणि जानकर यांचं बहीण-भावाचं नात हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. पण नेमकं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच भावाच्या नाराजीचा सामना पंकजांना करावा लागत आहे.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे महादेव जानकरांना नेहमी मानसपुत्र म्हणायचे. त्यांच्यानंतरही पंकजा मुंडे यांनी महादेव जानकर यांच्याशी बंधुत्वाचे संबंध कायम ठेवले. भगवानगड दसरा मेळावा असो किंवा बीड जिल्ह्यातील कार्यक्रम, जानकर हे नेहमी सोबत असायचे. पण गेल्या काही दिवसांपासून जानकर नाराज आहेत.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांनी जानकरांना बारामतीतून राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उमेदवारी दिली होती. संपूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरत गोपीनाथ मुंडेंनी पवारांच्या बारामतीतच राष्ट्रवादीची दमछाक केली होती. लाखोंच्या फरकाने जिंकणाऱ्या सुप्रिया सुळे केवळ 70 हजार मतांनी जिंकल्या होत्या.