आई प्रचारसभेत सांगायची, मुंडेसाहेबांचं चिन्ह कमळ अन् ही आमची पंकजा, भाजपसोबतचं नातं असं सांगितलं पंकजांनी!
लहानपणी गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचार सभेच्या वेळची आठवण सांगताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मुंडे साहेबांच्या प्रचारसभेत मी आईच्या कडेवर असायचे. सभेसाठी जमलेल्या लोकांना आई सांगायची, मुंडे साहेब यांचं चिन्ह कमळ आहे आणि ही आमची मुलगी पंकजा..
बीडः भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपल्या घराण्यात आणि आपल्या व्यक्तीमत्त्वाशी भाजपचे नाते किती जुने आहे, याबद्दल भावना व्यक्त केल्या. बीडमधील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची ज्येष्ठ कन्या पंकजा मुंडे यांनी भाजप (BJP) आणि कमळाशी त्यांचे नाते किती जवळचे आहे, याबद्दल आज प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या, मी नऊ महिन्यांची होते, तेव्हापासून मुंडेसाहेब प्रचारावेळी मला सोबत घेऊन जायचे. तेव्हा माझी आई मला कडेवर घेऊन जायची, अशा आठवणी पंकजा मुंडे यांनी कार्यक्रमात बोलताना जागवल्या.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे नगराचे लोकार्पण
माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीला उजाळा म्हणून बीड मध्ये वरद ग्रुपच्या वतीने लोकनेते गोपीनाथराव मुंडे नगर उभे केले आहे. याचा लोकार्पण सोहळा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी खा. प्रीतम मुंडे यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.गोपीनाथ मुंडे नावाचे हे राज्यातले पहिलेच नगर आहे. या नगराच्या लोकार्पण सोहळ्यात पंकजा मुंडे बोलत होत्या.
मुंडे साहेबांचं चिन्ह कमळ आणि ही पंकजा…
लहानपणी गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचार सभेच्या वेळची आठवण सांगताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मुंडे साहेबांच्या प्रचारसभेत मी आईच्या कडेवर असायचे. सभेसाठी जमलेल्या लोकांना आई सांगायची, मुंडे साहेब यांचं चिन्ह कमळ आहे आणि ही आमची मुलगी पंकजा.. तेंव्हापासून मी भाजपचा प्रचार करायचे असा किस्सा पंकजा मुंडे यांनी आज एका कार्यक्रमात सांगितला.
मुलगा झाला तर पंकज, मुलगी झाली तर पंकजा!
भारतीय जनता पक्ष मोठा करण्यात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा मोठा हात आहे. त्यांचे कष्ट आणि प्रयत्न पंकजा यांनी जवळून पाहिले आहेत. पंकजा यांच्या भाषणातदेखील वारंवर लहानपणीच्या आठवणींचा उल्लेख होत असतो. गोपीनाथ मुंडे आणि प्रज्ञा मुंडे यांची ज्येष्ठ कन्या पंकजा मुंडे यांचा जन्म 26 जुलै 1979 रोजी परळीत झाला. पंकजा यांच्या नावाच्या बाबतीत एक किस्सा परळीत सांगितला जातो, तो म्हणजे, पंकजा यांचे नाव त्यांचे मामा म्हणजेच प्रमोद महाजन यांनी ठरवले होते. मुलगा झाला तर पंकज आणि कन्या झाली तर पंकजा. त्याचे कारणही विशेष असेच होते. त्याच सुमारास भारतीय जनता पक्षाला कमळ हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. कमळाचा समानार्थी शब्द पंकज असा होतो. त्यावरून मुंडे साहेबांना कन्या झाल्यावर त्यांचे नाव पंकजा असे ठेवण्यात आले.
इतर बातम्या-