मुंबई : विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याच्या नावाची चर्चाही जोरात झाली. मात्र, नेहमीप्रमाणे त्यांचं नाव यावेळीही मागे पडलं. त्यामुळे पुन्हा एकदा पंकजा मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. राज्यात विविध भागात पंकजा मुंडे समर्थक रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. रविवारी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) बीड जिल्हा दौऱ्यावर असताना यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्नही पंकजा मुंडे समर्थकांनी केला. अशावेळी पत्रकारांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पंकजा मुंडे नाराज आहेत का? असा सवाल केला. त्यावर फडणवीस यांनी भाजप एक परिवार आहे आणि आम्ही सगळे या परिवाराचे सदस्य आहोत, असं उत्तर दिलं.
विधान परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा डावललं गेल्यामुळे पंकजा मुंडे नाराज आहेत, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. त्यांचे समर्थकही आक्रमक झाले आहेत. त्याबाबत विचारलं असता फडणवीस म्हणाले की, ‘पंकजाताई भाजपच्या मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्याकडे मध्यप्रदेशची जबाबदारी आहे. त्या सातत्याने मध्य प्रदेशला जात असतात. तिथे आता निवडणूकही आहे. तिथला प्रभार त्या सांभाळत आहेत. आम्ही सगळेच एकमेकांच्या संपर्कात असतो, तुम्ही काळजी करु नका. भारतीय जनता पार्टी एक परिवार आहे, आम्ही सगळे या परिवाराचे घटक आहोत’.
विधान परिषद निवडणुकीच डावललं गेल्याची भावना पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये आहे. त्यामुळे राज्यात अनेक शहरात पंकजा यांचे समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. रविवारी प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. तर औरंगाबादेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयासमोर मोठा राडा पाहायला मिळाला. असं असताना पंकजा मुंडे यांचं मौन मात्र कायम आहे. विधान परिषदेचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
भाजपमध्ये पंकजा मुंडे यांना एकटं पाडण्याचा डाव सुरू आहे. पंकजा यांच्या समर्थकांना तिकीट दिलं जात आहे आणि पंकजा मुंडे यांना वाऱ्यावर सोडलं जात आहे, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. राऊत यांच्या या टीकेचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला आहे. चिंता करू नका. पंकजा मुंडेची काळजी करायला भाजप समर्थ आहे. पंकजा मुंडे या भाजपच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीसांच्या घरातील मुलगी आहेत. त्यामुळे त्यांची काळजी करण्याची वेळ आली नाही आम्ही समर्थ आहोत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.