Video : 2024 ला मावळमध्ये राष्ट्रवादीकडून पुन्हा Parth Pawar? रोहित पवारांचं सूचक वक्तव्य; तर संजय राऊत म्हणतात…
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मावळ मतदारसंघ शिवसेनेनं पार्थ यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून करण्यात आलीय. इतकंच नाही तर रोहित पवार यांनीही पार्थ यांच्या उमेदवारीबाबत सूचक वक्तव्य केलंय.
मुंबई : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा वारू चौफेर उधळला होता. भाजप किंबहुना नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या लाटेपुढे भले-भले गारद झाले होते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजिव पार्थ पवार (Parth Pawar) यांनाही पराभवाचा सामना करावा लागला होता. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे (Shriranga Barne) यांनी पार्थ पवार यांना जवळपास सव्वा दोन लाखाच्या फरकारने पराभूत केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा पार्थ पवार चर्चेत आले आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मावळ मतदारसंघ शिवसेनेनं पार्थ यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून करण्यात आलीय. इतकंच नाही तर रोहित पवार यांनीही पार्थ यांच्या उमेदवारीबाबत सूचक वक्तव्य केलंय.
पार्थ पवार यांचा सोमवारी (21 मार्च) ला वाढदिवस पार पडला. पार्थ यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन देशमुख यांनी पार्थ पवार यांच्यासाठी शिवसेनेनं मावळ मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावा, अशी मागणी केलीय. याबाबत रोहित पवार यांना विचारण्यात आलं असता, रोहित यांनीही सूचक वक्तव्य केलंय. पार्थ पवार यांनी जर स्वत: मावळ मतदारसंघाची मागणी केली तर शेवटपर्यंत पाठपुरावा करण्यापासून ते त्यांच्या मतदारसंघात प्रचाराला सर्वात आधी मी असेन, असं रोहित पवार म्हणाले. रोहित पवार यांच्या या वक्तव्यामुळे आता महाविकास आघाडीत चर्चेला उधाण आलंय.
संजय राऊतांनी राष्ट्रवादीची मागणी फेटाळली
दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीची मागणी फेटाळून लावलीय. मावळचे श्रीरंग आप्पा बारणे खासदार आहेत आणि तेच राहतील. पार्थ पवार तरुण आहे, त्यांचा विचार त्यांचा पक्ष करेल. आमच्याकडे काही प्रस्ताव आला तर त्यावर बोलू, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय.
रोहित पवारांकडून पार्थ यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार रोहित पवार यांनी खास शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी खास फोटो शेअर केला असून या फोटोची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरु आहे. ‘माझे बंधूराज पार्थ पवार आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! आपल्याला निरोगी आरोग्य आणि उज्ज्वल भविष्य लाभो, ही प्रार्थना!’ असं ट्वीट रोहित पवार यांनी केलंय.
माझे बंधूराज @parthajitpawar आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्याला निरोगी आरोग्य आणि उज्ज्वल भविष्य लाभो, ही प्रार्थना! pic.twitter.com/5VGtA8kRPQ
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 21, 2022
इतर बातम्या :