पाटीदार समाजाचा 9 -11 जागांवर प्रभाव, हार्दिक पटेलचा काँग्रेसला किती फायदा?
अहमदाबाद : पाटीदार आरक्षणासाठी आंदोलन उभा करणारा गुजरातमधील तरुण नेता हार्दिक पटेलने अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या होमग्राऊंडमध्ये भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने हार्दिक पटेलला संधी दिल्याचं बोललं जातंय. हार्दिक जामनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. 2017 मध्ये त्याने विधानसभा निवडणूक लढवली नव्हती, कारण तेव्हा त्याचं वय नव्हतं. […]
अहमदाबाद : पाटीदार आरक्षणासाठी आंदोलन उभा करणारा गुजरातमधील तरुण नेता हार्दिक पटेलने अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या होमग्राऊंडमध्ये भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने हार्दिक पटेलला संधी दिल्याचं बोललं जातंय. हार्दिक जामनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. 2017 मध्ये त्याने विधानसभा निवडणूक लढवली नव्हती, कारण तेव्हा त्याचं वय नव्हतं. पण तो आता लोकसभा निवडणूक लढणार आहे.
गुजरातमध्ये लोकसभेच्या 26 जागा आहेत. भाजपने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडासाफ करत सर्वच्या सर्व 26 जागा जिंकल्या होत्या. पण त्यानंतर झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला घाम फोडला. पाटीदार नेता हार्दिक पटेलनेही काँग्रेसला पाठिंबा दिला होता. भाजपला बहुमत तर मिळालं, पण गेल्या वेळच्या 115 जागांच्या तुलनेत केवळ 99 जागांवर विजय मिळाला. दुसरीकडे काँग्रेसचा आकडा 61 वरुन 77 वर आला. पण विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या पाच आमदारांनी आतापर्यंत पक्षाला रामराम केलाय आणि भाजपचा झेंडा हातात घेतलाय. यापैकी तीन आमदार तर गेल्या चार दिवसातच भाजपात गेले आहेत.
काँग्रेसच्या या पाच आमदारांचा आतापर्यंत भाजपात प्रवेश
जामनगर ग्रामीणमधून काँग्रेस आमदार वल्लभ धारविया यांनी भाजपात प्रवेश केला. वल्लभ साथवारा समाजातून आहेत. या समाजाची जवळपास दीड लाख मतं जामनगर मतदारसंघात आहेत. याच मतदारसंघातून लढण्यासाठी हार्दिक पटेल इच्छुक आहे.
ध्रांगधरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार पुरुषोत्तम सबारिया आणि माणवदरचे आमदार जवाहर चावला यांनीही गेल्या आठवड्यातच काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलाय. सबारिया कोळी समाजाचे आहेत, ज्यांचे गुजरातमध्ये 24 टक्के मतदार आहेत. तर जवाहर चावला अहीर समाजाचे आहेत.
यापूर्वी फेब्रुवारीमध्ये उंझाच्या आमदार आशा पटेल यांनीही भाजपात प्रवेश केला होता. आशा पटेल या पाटीदार समाजाच्या नेत्या आहेत. आशा पटेल यांच्या रुपाने भाजपची ताकद आणखी वाढल्याचं बोललं जातं.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात जसदनमधील काँग्रेसचे आमदार कुंवरजी बावलिया यांनीही भाजपात प्रवेश केला. ते कोळी समाजाचे आहेत. गुजरातमध्ये कोळी समाज मोठा असल्याने भाजपने आतापासूनच जातीय समीकरणे जुळवण्यास सुरुवात केली आहे.
हार्दिक पटेलचा फायदा होणार?
गुजरातमध्ये काँग्रेसकडे कोणताही चेहरा नाही. त्यामुळे हार्दिक पटेलच्या रुपाने पक्षाला एक चेहरा मिळण्याची शक्यता आहे. हार्दिक पटेल ज्या समाजातून आहे, त्या पटेल समाजाचा 9 – 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रभाव आहे. गुजरातमध्ये 15 टक्के पटेल आहेत, पण पटेलांमध्ये कडवा आणि लेऊवा हे दोन समाज आहेत. हार्दिक पटेलच्या कडवा समुदायाचा प्रभाव 4 ते 5 जागांवर आहे. पाटीदार समाजातील अनेक दिग्गज नेतेही भाजपात आहेत. त्यामुळे युवा हार्दिक पटेलचा प्रभाव किती दिसतो ते निवडणुकीत समजणार आहे.