Video : मंत्रीपदावरुन भाजपामध्ये शांतता, शिंदे गटामध्ये मात्र अस्वस्थता, कुणाची काय अपेक्षा? वाचा सविस्तर
आपण मंत्रीपदासाठी नाहीतर राज्याच्या विकासासाठी आणि हिंदुत्वासाठी बंड केल्याचे म्हणणारे शिंदे गटातील आमदार आता मुख्य खात्यावर लक्ष केंद्रित करीत आहेत. यापूर्वी जे मंत्री होते त्यांना तर मंत्रिपद हवे आहेच पण ज्यांनी या बंडामध्ये आघाडीवर राहण्याची भूमिका घेतली आहे त्यांच्या देखील अपेक्षा वाढल्या आहेत. काही आमदारांनी तर आपली ईच्छा बोलूनही दाखवली आहे.
मुंबई : विधानसभेमध्ये बहुमत सिध्द केल्यानंतर आता लक्ष लागले आहे ते (Cabinet Expansion) मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे. याबाबत भाजपाने आणि (Eknath Shinde) शिंदे गटानेही कमालीची गोपनियता पाळली असली तरी शिंदे गटातील आमदार हे गुडघ्याला बाशिंग बांधून महत्वाच्या खात्यावर दावा करीत आहेत. तर दुसरीकडे पक्षाचा निर्णय अंतिम मानल्या जाणाऱ्या (BJP) भाजपामध्ये मात्र कमालीची शांतता आहे. जिथे देवेंद्र फडणवीस यांना ऐनवेळी उपमुख्यमंत्री पद घ्यावे लागते तिथे इतरांचे काय अशी अवस्था भाजपाची झाली आहे. त्यामुळे 12 जुलै रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे सांगितले जात असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठका सुरु झाल्या आहेत.
कुणाचा काय आहे दावा?
आपण मंत्रीपदासाठी नाहीतर राज्याच्या विकासासाठी आणि हिंदुत्वासाठी बंड केल्याचे म्हणणारे शिंदे गटातील आमदार आता मुख्य खात्यावर लक्ष केंद्रित करीत आहेत. यापूर्वी जे मंत्री होते त्यांना तर मंत्रिपद हवे आहेच पण ज्यांनी या बंडामध्ये आघाडीवर राहण्याची भूमिका घेतली आहे त्यांच्या देखील अपेक्षा वाढल्या आहेत. काही आमदारांनी तर आपली ईच्छा बोलूनही दाखवली आहे. यामध्ये दादा भुसे हे जलसंपदा खात्यासाठी आग्रही आहेत तर गुलाबराव पाटलांना पाणीपुरवठा हे खातं हवं आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत ग्रामीण भागाशी संलग्न असलेले खाते मागणारे बच्चू कडू हे सामाजिक न्यायसाठी आग्रही आहेत. त्यामुळे नाही म्हणलं तरी शिंदे गटातील आमदारांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
शिंदेंची कसोटी, उपमुख्यमंत्री मात्र शांत
शिंदे गटात भाजपाच्या तुलनेत आमदारांची संख्या ही कमी आहे पण मंत्रीपदासाठी इच्छूकांची संख्या मात्र वाढत आहे. त्यामुळे दबक्या आवाजातील चर्चा आता उघड होऊ लागल्याने कुणाची काय अपेक्षा हे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आले असले तरी ते प्रत्येकाची इच्छा पूर्ण करु शकणार हे पहावे लागणार आहे. तर दुसरीकडे सत्ता स्थापनेची गोळाबेरीज होत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री पदाच्या अपेक्षेत राहू नका. यासाठी काही काळ थांबावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे भाजपात इच्छूक असले तरी वाच्यता नाही पण शिंदे गटात अपेक्षाभंग झाल्यावर काय असा सवाल उपस्थित होत आहे.
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठकावर-बैठका
मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यापूर्वी काय रणनिती असणार यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठकावर बैठका पार पडत आहे. गुरुवारी दोघांमध्ये सह्याद्री येथे बैठक पार पडली तरी अंतिम निर्णयासाठी हे दोघे दिल्ली वारीवरही जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भाजपाचे सर्वकाही दिल्लीत ठरणार असले तरी मुख्यमंत्री आपल्या गटाला कसे हातळतात हे पहावे लागणार आहे.