मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांच्या मुंबईतील पहिल्या सभेला अखेर परवानगी मिळाली आहे. मात्र, ही सभा 24 एप्रिलऐवजी 23 एप्रिलला मुंबईतील शिवडीतील काळाचौकी मैदानात होणार आहे. पहिल्यांदा राज ठाकरेंच्या या सभेला परवानगी नाकारण्यात आल्याचे वृत्त आले होते. त्यामुळे मनसेची सभा होणार की नाही, असा प्रश्न तयार झाला होता.
राज ठाकरे यांच्या मुंबईसह पनवेल आणि नाशिक येथे एकूण 4 सभा होणार आहेत. त्यापैकी पहिल्या 2 सभा अनुक्रमे 23 आणि 24 एप्रिलला मुंबईत, तिसरी सभा 25 एप्रिलला पनवेल येथे आणि शेवटची चौथी सभा 26 एप्रिलला नाशिकला होईल, अशी माहिती मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी दिली आहे.
दरम्यान, सभेला परवानगी मिळण्यात शिवसेनेने खोडा घातल्याचीही चर्चा होती. निवडणूक सभांना परवानगी देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या एक खिडकी योजनेअंतर्गत राज ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली होती. यावेळी मनसे निवडणूक लढवत नसल्याचेही कारण देण्यात आले होते. त्यानंतर या सभेसाठी महानगरपालिकेकडून परवानगी घेण्यास सांगितले गेले. मात्र, तेथे परवानगी देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप मनसेने केला होता.
राज ठाकरे यांच्या सभांना महाराष्ट्रातून मिळणार भरघोस प्रतिसाद आणि त्याची देशभर सुरु असलेली चर्चा यामुळे शिवसेना धास्तावली असल्याचीही चर्चा आहे. त्याचा परिणाम म्हणूनच राज ठाकरेंच्या सभेला आडमार्गांनी विरोध होत आहे, असा आरोप शिवसेनेवर होत आहे.
राज ठाकरेंच्या मुंबईतील सभांचे वैशिष्ट्य
राज ठाकरे यांनी राज्यभर केलेल्या सभांनंतर निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात होणाऱ्या या सभांचे विशेष महत्त्व असणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्यात महाराष्ट्रात आत्तापर्यंतच्या सर्वाधिक 17 जागांवर मतदान होणार आहे. याआधी पहिल्या टप्प्यात 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यासाठी 10 जागांसाठी मतदान झाले आहे. तसेच तिसऱ्या टप्प्याच्या मतदानात 14 जागांवर मतदान होईल. राज ठाकरेंच्या मुंबईतील सभांचा परिणाम फक्त मुंबईत न होता महाराष्ट्रातील इतर ठिकाणांवरही होईल, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. राज ठाकरे ज्या पद्धतीने मोदी-शाह यांच्यावर पुराव्यांनिशी आरोप करत आहे. त्याने भाजपच्या प्रतिमेला तडे जात आहेत. याचा थेट परिणाम मतदानावर किती होणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल.